आपल्या शरीरासाठी दारू पिणे हानिकारक असल्याचे माहित असूनही मोठ्या प्रमाणावर जगभरात दारू प्राशन केली जाते. अनेक प्रकारची दारू बाजारात मिळते. देशीपासून ते रम, व्हिस्की, चुल्ह्यावरली, मोहाची, ब्रँडी, जीन, हंडिया आणि बिअर. येथेच ही नावे थांबत नाहीत. अशा अनेक चित्रविचित्र प्रकारची दारू जगभरात मिळते. ब्रँडनुसार त्याच्या फायद्याचे अजब तर्क दिले जातात.
येथे लहान मुलांच्या विष्ठेपासून तयार केली जाते दारू
याच रांगेत आता कोरियाची एक विशेष प्रकारची दारू चर्चेचा विषय बनली आहे. लहान मुलांच्या विष्ठेपासून ही दारू तयार केली जाते. आणि जाणकार या दारूला अत्यंत फायदेशीर असल्याचे सांगतात. मानवी विष्ठेपासून मद्य तयार करण्याचे कोरियन डॉक्टर ली चांग सू हे तज्ज्ञ आहेत. त्यांनी याबाबत एका कोरियन वृत्तसंस्थेशी चर्चा करताना माहिती दिली. कोरियामध्ये विष्ठेपासून बनलेल्या मद्याला Ttongsul (सॉन्गसुल) असे म्हणतात. त्यांनी सांगितले की, ही दारू तयार करण्यात राइस वाइन, किण्वित मानवी विष्ठा आणि 9 टक्के अल्कोहोल यांचा वापर केला जातो.
डॉक्टर सू यांच्या मते, तीव्र वेदनांपासून या मद्यामुळे सुटका होते. मोडलेली हाडे पुन्हा सांधण्यासाठी फायदेशीर आहे. शिवाय शरीराला डिटॉक्सीफाय करण्यातही मदत करते. या मद्यामुळे आरोग्याशी संबंधित जवळपास सर्वच समस्यांमध्ये आराम मिळतो. डॉक्टर ली सांगतात की, लहान मुले (४ ते ७ वर्षे) यांची विष्ठा जास्त उपयुक्त आहे. कारण यात दुर्गंधी कमी असते. फक्त कोरियातच विष्ठेपासून बनवल्या जाणाऱ्या मद्याचे चलन आहे. तथापि, कोरियातील बहुतांश जनता मात्र यापासून चार हात लांबच आहे.