या व्यक्तीने तब्बल ३३ वर्षापासून कापल्या नाहीत मिशा

girdhar-vyas
मुले आणि पुरुषांसाठी अनेकदा मिशा वाढवणे आणि त्याच्या वेगवेगळ्या स्टाईल करणे ही महत्त्वाची गोष्ट असते. सध्याच्या काळात मिशी ही स्टाईल स्टेटमंट झाली आहे. ही मिशी आता कधीच कापली नाही तर ती किती वाढेल याची आपण कल्पनाही करु शकणार नाही. पण एक दोन नाही तर तब्बल ३३ वर्ष एका व्यक्तीने आपली मिशी वाढवली आहे. ही करामत राजस्थानच्या बिकानेरमध्ये राहणारे गिरधर व्यास यांनी केली आहे. आता ते ५८ वर्षांचे असून त्यांनी मागील ३३ वर्षांपासून मिशी एकदाही कापलेली नाही.

३३ वर्ष मिशा न कापल्यामुळे त्यांच्या मिश्या २८ फूट लांब वाढल्या आहेत. त्यांना या मिशा नीट करण्यासाठी रोज ३ तासांचा वेळ लागतो. त्यांनी आपल्या या मिशांना एकदाही साबण आणि शाम्पू लावला नसल्याचे ते सांगतात. मी रोज सकाळी उठल्यावर मिशा नीट करायला बसतो आणि माझा त्यासाठी बराच वेळ जात असल्याचेही त्यांनी सांगितले. ते मिशा धुण्यासाठी मुलतानी माती वापरतात. तसेच ते त्याचे केस मुलायम राहण्यासाठी त्यांना लिंबू आणि मिरपूड यांचा लेप लावतात. मिशांना आपण तेलाने मालिश करतो, असेही त्यांनी सांगितले.

या मिशा त्यांनी केवळ आवड म्हणून वाढविल्या असल्याने आता ते आवडीने त्याची काळजी घेतात. पण ही काळजी घेणे हे अवघड आणि अतिशय संयमाचे काम असल्याचे ते म्हणतात. पण या मिशांमुळे मला खुप प्रसिद्धी मिळत असून लोक मला सेलिब्रिटीप्रमाणे वागणूक देतात असेही व्यास सांगतात.