पाकिस्तानने केली चिनी गुंतवणुकीत दोन अब्ज डॉलरची कपात

invesment
चिनी कर्जाच्या सापळ्यात अडकण्याच्या भितीने पाकिस्तानने आपल्या देशातील रेल्वे क्षेत्रात होणाऱ्या गुंतवणुकीत दोन अब्ज डॉलरची कपात केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकार चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गावरही (सीपीईसी) पुनर्विचार करू शकते, या चर्चेला या निर्णयामुळे बळ मिळाले आहे.

मंगळवारी पाकिस्तानी माध्यमांमध्ये प्रकाशित बातम्यांमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. रेल्वेमध्ये सीपीईसीचा वाटा 8.2 अब्जांवरून 6.2 अब्ज डॉलर करण्यात आली आहे, असे पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनी जाहीर केले आहे. ‘‘पाकिस्तान हा एक गरीब देश आहे आणि आम्ही कर्जाचा भार उचलू शकत नाही,’’ असे अहमद यांनी लाहोर येथे पत्रकारांना सांगितले.

‘‘त्यामुळे रेल्वे प्रकल्पांतील सीपीईसीच्या अंतर्गत चीनचे कर्ज आम्ही कमी केले आहे. सीपीईसी हा पाकिस्तानच्या पाठीचा कणा आहे, परंतु आमचे कान व डोळेही उघडे आहेत,’’ असे ते म्हणाले.

सीपीईसी योजनेला मागील नवाज शरीफ सरकारने सुरूवात केली होती. ही योजना 62 अब्ज डॉलरची असून तिचा इम्रान खान यांचे सरकार पुनर्विचार करू शकते, अशी चर्चा आहे.

Leave a Comment