निवडणूक प्रचार स्वच्छ ठेवण्यासाठी गुगल, फेसबुक करणार मदत

combo
फेसबूक, गुगल आणि ट्विटर ही इंटरनेटवरील दादा मंडळी भारतातील निवडणूक प्रचार स्वच्छ ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाला मदत करणार आहे. प्रचार काळात निवडणुकीच्या पावित्र्याचा भंग होईल, अशा पद्धतीचा कुठल्याही मजकूर आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करू दिला जाणार नाही, अशी ग्वाही या कंपन्यांनी दिली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी ही माहिती दिल्याचे पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे. रावत म्हणाले, “कर्नाटक निवडणुकीच्या काळात याची चाचणी झाली होती. तो एक छोटा प्रयोग होता. ती सुरुवात होती. यावर्षीच्या शेवटी होणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोरम या चार राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत आता आम्ही थोडा मोठा प्रयोग करणार आहोत.”

वरिष्ठ उप निवडणूक आयुक्त उमेश सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील एका समितीने गुगल, फेसबुक आणि ट्विटर या कंपन्यांच्या स्थानिक आणि क्षेत्रीय प्रमुखांना बोलावले होते. खोट्या बातम्या आणि तत्सम मजकुराच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल थांबविण्यासाठी ते काय करू शकतात, असे या समितीने त्यांना विचारले होते.

“निवडणुकीची निष्पक्षता बाधित होईल अशा प्रकारचे काहीही आम्ही होऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. प्रचार संपल्यानंतर मतदानापर्यंत 48 तास निवडणुकीशी संबंधित काहीही आम्ही आमच्या वेबसाईटवर येऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे,” असे राहत म्हणाले.

या वेबसाईटवर प्रकाशित केलेल्या जाहिराती आणि केलेला खर्च याचीही माहिती आयोगाला देण्यात येईल. जेणेकरून तो खर्च एकूण निवडणूक खर्चा मध्ये गृहीत धरण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment