जेव्हा चोरांची होते फजिती तेव्हा…

ganja
एखाद्याला फसवून चोरांनी लुबाडले, तर त्या व्यक्तीची मनस्थिती कशी होत असेल याची कल्पना आपण सर्वच जण करू शकतो. मात्र अमेरिकेतील कॉलाराडो या ठिकाणी एका डिस्पेंसरी मध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने घुसलेल्या चोरांचीच फजिती झाल्याची घटना नुकतीच घडली. या संबंधीचे वृत्त ‘डेन्व्हर पोस्ट’ ने नुकतेच प्रसिद्ध केले आहे. ही घटना सोशल मिडीयावरही व्हायरल होत असून, त्यामुळे नेटीझन्सचे भरपूर मनोरंजन होत आहे. कॉलराडो येथे चोरांची एक टोळी, मारिजुआना या अंमली पदार्थाची चोरी करण्याच्या उद्देशाने एका मारिजुआना डिस्पेंसरी मध्ये अगदी फिल्मी ढंगाने प्रवेश करती झाली. आपल्या व्हॅनने या डिस्पेंसरीच्या दर्शनी भागेतील काचेला जोराने धडक देऊन चोरट्यांनी आत प्रवेश केला. चोरांनी मारिजुआना समजून जी हिरवी वाळविलेली पानांची पोती उचलली, ती पाने वास्तविक ‘ओरेगानो’ हे स्वयंपाकामध्ये वापरली जाणारी होती.
ganja1
हे पोती घेऊन पळ काढून काही अंतर दूर गेल्यानंतर ही पाने मारिजुआनाची नसून ओरेगानोची आहेत हे कळल्यावर चोरांची काय प्रतिक्रिया झाली असेल, याची कल्पना आपण नक्कीच करू शकतो. मारिजुआना चोरी करून बाहेर दुप्पट किंमतीला विकण्याचा घाट घालणाऱ्या या चोरांची चांगलीच फजिती झाली. गेल्या आठवड्यात ही घटना अगदी पहाटेच्या वेळी कोलराडो येथील ‘नेटीव्ह रूट्स डीस्पेन्सरी’ मध्ये घडली असल्याचे समजते.
ganja2
या दुकानामध्ये मारिजुआना उपलब्ध असली, तरी ती उघड्यावर कधीही न ठेवता कायम कुलुपबंद असल्याचा खुलासा दुकानाच्या मालकाने केला. त्यामुळे मारिजुआना चोरण्यास आलेल्या चोरट्यांनी मारिजुआना समजून ओरेगानो आणि काही टी शर्टस् लांबविले. घडल्या प्रकारचे वृत्त प्रसिद्ध होताच वाचकांचे आणि नेटीझन्सचे भरपूर मनोरंजन झाले असून, सध्या पोलीस संबंधित चोरांच्या शोधात असल्याचे समजते.