अॅमेझॉन, फ्लिपकार्ट खरेदीसाठी उपलब्ध करून देणार बिनव्याजी कर्ज

flipkart
मुंबई – अवघ्या काही दिवसांवर दसरा आणि दिवाळी हे सण येऊन ठेपले आहेत. बराच पैसा सणासुदीच्या काळात खरेदीसाठी लागतो. पण पुरेशी बचत तुमच्याकडे नसेल तर कुठूनतरी उधार घेण्याची वेळ तुमच्यावर येते. पण उधार घेतलेल्या पैशांवर तुम्हाला ठराविक टक्के व्याजही भरावे लागते. पण ही चिंता आता दूर होणार आहे. कारण बिनव्याजी कर्जाची सुविधा अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ऑनलाईन शॉपिंग पोर्टलकडून उपलब्ध होणार आहे. या कंपन्यांनी ग्राहकांची अडचण लक्षात घेऊन पुढाकार घेत हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या कर्जाची रक्कम आता किती असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर या दोन्ही कंपन्यांकडून जास्तीत जास्त ६० हजार रुपये कर्ज मिळू शकते.

अॅमेझॉन १० ऑक्टोबरपासून आपला सर्वात मोठा वार्षिक फेस्टीव सिझन सेल सुरु करत आहे. तर दुसरीकडे फ्लिपकार्टही बिग बिलियन सेल सुरु करत आहे. मोबाईल अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना ही उधार मिळेल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. ग्राहकांना यासाठी आपल्या पॅनकार्ड आणि आधार कार्डची माहिती भरावी लागणार आहे. त्या ग्राहकाला त्यानंतर किती रक्कम उधार मिळू शकते हे समजू शकणार आहे. कर्जाची रक्कम ग्राहकांची खरेदी करण्याची पद्धत आणि पेमेंट करण्याचा इतिहास यावरुन मंजूर होणार आहे. याशिवाय ग्राहकांना या कंपन्यांकडून डेबिट कार्डवर ईएमआय, नो कॉस्ट ईएमआय आणि पेबॅक गॅरंटी यांसारख्या सुविधा मिळणार आहेत. अॅमेझॉन इंडियाचे मॅनेजमेंटचे उपाध्यक्ष मनीष तिवारी या बिनव्याजी कर्जाच्या नवीन सुविधेबाबत म्हणाले, ऑनलाईन खरेदीकडे जास्तीत जास्त ग्राहकांना वळवायचे असेल तर नवनवीन सुविधा देणे आवश्यक असून कंपनी त्यानुसार प्रयत्न करत आहे.

Leave a Comment