बरसाना पर्वतावरील राधाराणी मंदिर

radharani
राधा कृष्ण प्रेमाच्या अनेक कथा सांगितल्या जातात. या राधेला समर्पित असे एक अतिशय सुंदर आणि मनमोहक मंदिर वृंदावनजवळ असलेल्या २५० फुट उंचीच्या बरसाना पहाडावर आहे. दरवर्षी राधा अष्टमीला येथे मोठी जत्रा भरते. श्रावणातील गोकुळ अष्टमी नंतर १५ दिवसांनी राधा अष्टमी साजरी करण्याची प्रथा आहे. या मंदिरात जाण्यासाठी बऱ्याच पायऱ्या चढून जावे लागते. हा सारा परिसर अतिशय रमणीय आणि हिरवागार आहे.

असे सांगतात कि १६५५ मध्ये राजा वीरसिंग याने हे मंदिर उभारले मात्र त्यानंतर स्थानिक लोकांनी हे मंदिर दगडात बांधून काढले. हे मंदिर बांधताना काळसर आणि पांढऱ्या दगडांचा वापर केला असून हे दोन्ही रंग कृष्ण आणि राधा याच्या अमर प्रेमाचे प्रतिक मानले जातात. येथून ४ किमीवर असलेल्या नंदगाव येथे कृष्णाचे पालक वडील नंद याचे घर होते.

राधा अष्टमीला राधा राणी मंदिरात अतिशय मोहक अशी सजावट फुले आणि फळे वापरून केली जाते. राधेला लाडू आणि छप्पन भोग चढविले जातात आणि त्याचा प्रसाद सर्वप्रथम मोरांना दिला जातो आणि नंतर भाविकात वाटला जातो. मोर हे राधा कृष्णाचे स्वरूप मानले जातात.

Leave a Comment