अंधांना दृष्टी देणाऱ्या गोविंदप्पा वेंकटस्वामींना गुगलचा ‘डुडल सलाम’

google
नवी दिल्ली – आज गुगल या सर्च इंजिनने डुडलद्वारे अंधकारात रस्ता चाचपडणाऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश टाकणाऱ्या गोविंदप्पा वेंकटस्वामी यांना मानवंदना वाहिली आहे. आज दृष्टीहीन लोकांना दृष्टी देण्यासाठी आयुष्यभर धडपडणाऱ्या गोविंदप्पांचा जन्मदिवस असून शब्दांत सांगण्यापलिकडे असे त्यांचे योगदान आहे.

दक्षिण भारतातील एका छोट्याशा गावात गोविंदप्पा यांच्या जन्म १ ऑक्टोबर १९१८ मध्ये झाला. डोळ्यांचे तज्ज्ञ असलेल्या गोविंदप्पांनी अरविंद नावाने डोळ्यांचे रुग्णालय सुरू केले. केवळ भारतातच नव्हे तर सातासमुद्रापलिकडेही त्यांचे काम होते. ५५ दशलक्ष रुग्णांना गोविंदप्पांनी दृष्टी दिली आणि ७ दशलक्ष रुग्णांवर शस्त्रक्रिया केली. त्यांनी सुरू केलेले रुग्णालय ना-नफा-ना-तोटा तत्वावर होते. जवळपास ५० टक्के रुग्णांनी मोफत उपचार करून घेतला. ज्या रुग्णांनी पैसे दिले होते, त्यांच्या पैशांवर ते इतर गरीब रुग्णांवर उपचार करीत होते.

जगभर त्यांच्या कार्यामुळे त्यांची ओळख निर्माण झाली होती. त्यांनी डोळ्यांवर उपचार करण्यासाठी वैज्ञानिक आणि तांत्रिकदृष्ट्या अथक अभ्यास केला आणि अनेक रुग्णांच्या आयुष्यात सुईचा वापर न करता त्यांनी प्रकाश आणला, हे विशेष. उपचारासंदर्भात एक “मॉडेल” गोविंदप्पांनी तयार केले होते. याच मॉडेलचा अवलंब जगभरातील अनेक डॉक्टरांनी केला. १९७० पासून गोविंदप्पा हे शिबिरे लावत होते. तेव्हापासून त्यांची लोकप्रियता वाढली होती. त्यांनी चेन्नई येथील स्टॅनले वैद्यकीय महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर ते भारतीय लष्करात वैद्यकीय डॉक्टर काम केले.

Leave a Comment