सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले; आता घरगुती गॅसही महागला

gas
नवी दिल्ली – देशातील सर्वसामान्य जनता आधीच सततच्या इंधन दरवाढीमुळे त्रस्त आहे. नागरिकांना अद्याप ही काही दिलासा मिळण्याची चिन्हे नसतानाच त्यांच्या डोकेदुखीत आता पुन्हा वाढ झाली आहे. अनुदानित सिलेंडरच्या किमतीत दिल्लीत २.८९ रुपयांनी वाढ झाली असल्यामुळे प्रति सिलेंडरचा दर आता ५०२.४ रुपये असणार आहे.

ऑक्टोबर महिन्यात विना अनुदानित सिलेंडरच्या दरांमध्ये दिल्लीत ५९ रुपयांनी वाढ झाली आहे. यावर बोलताना इंडियन ऑयलने सांगितले, की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वाढत्या किमती आणि परकीय चलन विनिमय दरातील उतार-चढाव यामुळे सिलेंडरच्या किमतीत ही वाढ प्रामुख्याने करण्यात आली आहे. प्रति सिलेंडरचे दर २.८९ रुपयांनी वाढण्यास जीएसटीही प्रमुख कारण असल्याचे कंपनीने सांगितले.

ग्राहकांच्या खात्यात ऑक्टोबरमध्ये ३७६.६० रुपये प्रति सिलेंडर अनुदान जमा करण्यात येणार आहे. हे अनुदान सप्टेंबर २०१८ मध्ये ३२०.४९ रुपये होते. घरगुती गॅस सिलेंडरबरोबरच आता सीएनजीही महाग झाले आहे. दिल्लीत सीएनजीच्या दरामध्ये प्रति किलो १.७० रुपये, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये १.९५ रुपये प्रति किलो, रेवाडी येथे १.८० रुपये प्रति किलो, अशी वाढ करण्यात आली आहे. ३० सप्टेंबर-१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ही वाढ लागू करण्यात येणार आहे. विमान इंधनाचे (एटीएफ) देशांतर्गत दर २६५० रूपये प्रति किलोलीटर वाढले आहेत. त्यामुळे हवाई प्रवासही महागला आहे. नवीन किमती या रविवारी मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत.

Leave a Comment