४ वर्षात बँकांनी वाटली ३ लाख १६ हजार कोटींची खिरापत

reserve-bank
नवी दिल्ली: एप्रिल २०१४ ते एप्रिल २०१८ दरम्यान देशभरातील २१ सरकारी बँकांनी तब्बल ३ लाख १६ हजार ५०० कोटी रुपयांचे बुडित कर्ज राईटऑफ केले आहे. या बँकांनी त्या तुलनेत अवघी ४४ हजार ९०० कोटी रुपयांची वसुली केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त भारतीय रिझर्व्ह बँकेच्या हवाल्याने दिले आहे. पण शेतकऱ्यांना कर्ज देताना कुचराई करणाऱ्या बँकांनी तब्बल ३ लाख १६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी नेमकी कोणाची केली? हा खरा प्रश्न आहे.

रिझर्व्ह बँकेने तीन महिन्यापूर्वीच आपला अहवाल सादर करत, २०१७-१८ या एकाच वर्षात १० बँकांनी बड्या कंपन्यांचे १ लाख कोटी रुपयांचे कर्ज राईट ऑफ केल्याचे म्हटल्यामुळे आता जी कर्जमाफी किंवा ज्यांचे कर्ज आरबीआयने राईटऑफ केले आहे, ते कोणाचे असू शकते यासाठी जास्त डोके लावण्याची गरज नाही.

संसदीय समितीसमोर रिझर्व्ह बँकेने आपला आर्थिक अहवाल सादर केला. त्यानुसार सार्वजनिक बँकाचा चार वर्षातील कर्जवसुली दर (रिकव्हरी रेट) हा १४.२ टक्के आहे. हा खासगी बँकांच्या पाच पट असल्याचा दावा करण्यात आला आहे. देशात सार्वजनिक २१ बँकांचे आर्थिक व्यवहाराचे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत आहे. पण त्यांचा बुडीत कर्जाचा वाटा ८६ टक्के एवढा आहे. म्हणजेच खासगी बँका केवळ ३० टक्के व्यवहार करत असताना, त्यांचे बुडीत कर्जाचे प्रमाण केवळ १४ टक्के एवढे आहे.

Leave a Comment