अॅपल व्हॅली अशी ओळख असलेले शांत, सुंदर रोहरू

rohruhi
हिमाचल प्रदेशाला निसर्गाने मुक्त हस्ते सौंदर्याचे वरदान दिले आहे. हिमाचल मधील शिमला, कुलू, मनाली सारखी अनेक ठिकाणे लोकप्रिय पर्यटन स्थळे म्हणून जगाच्या नकाशावर आली आहेत. पर्यायाने या ठिकाणी गर्दी वाढली आहे. सुटीत शांत, रम्य ठिकाणी आपल्या जिवलागांसोबत चार दिवसासाठी जाण्याचा विचार करत असलात तर हिमाचल मधील ऑफबीट डेस्टीनेशन म्हणून रोहरु या छोट्याश्या गावाचा नक्की विचार करा.

farms
सिमल्यापासून १५५ किमीवर असलेले पाबर नदीकाठी वसलेले रोहरु आणि त्याच्या आसपासचा परिसर समुद्रसपाटीपासून साधारण ५ हजार फुट उंचीवर असून या साऱ्या भागाला सफरचंदाचे खोरे किंवा गोल्डन बेल्ट असे नाव आहे. कारण येथे उत्तम प्रतीची सफरचंद पिकतात. सफरचंदाच्या बागा चोहीकडे दिसतात तसेच ट्राउट मासेहि येथे मोठ्या प्रमाणावर मिळतात त्यामुळे फिशिंगचा आनंद लुटता येतो.

hatkeshwari
राजा बजरंग बहादूर शाह याला हे ठिकाण खूपच भावले होते व त्यानेच या भागाचा विकास केला असे सांगितले जाते. या गावाला मोठा इतिहास आहे. लाकडी, दगडी बांधकामची जुनी पारंपारिक घरे आजही येथे पाहायला मिळतात. रोहारू पासून ११ किमीवर मत हरेश्वरी मंदिर असून हे प्राचीन मंदिर आदि शंकराचार्य यांनी वसविले असे सांगितले जाते. या मंदिरात सिंहावर आरूढ महिषासुरमर्दिनीची सुंदर मूर्ती असून आसपास शिवमंदिरे आहेत. तसेच येथील शिकरू देवता मंदिर आवर्जून पाहावे असे.

shikru
शिक्रूदेवतेची मूर्ती जवळच असलेल्या चीरगाव या सुंदर सरोवरात मिळाली होती. या देवतेला खऱ्या मानाने केलेली प्रार्थना फळास येते असा विश्वास असून येथे दर वर्षी यात्रा भरते. तसेच बाकाराळू देवतेचे मंदिर साधारण २० किमीवर असून या देवतेला यंदा सफरचंदे खूप येउदेत अशी प्रार्थना केली जाते. दर १० -१२ वर्षांनी मोठा मेळा भरतो.

हा सारा परिसर अवतीभोवती डोंगरांनी वेढलेला असून अतिशय निसर्गरम्य आहे. उन्हाळ्यात येथील हवा फारच खुशगवार असतेच पण थंडीतही खास बर्फवृष्टीची मजा लुटता येते. येथे कॅम्पिंग, पॅराग्लायडिंग, फिशिंग, ट्रेकिंग यांची मजाही लुटता येते.

Leave a Comment