व्हाट्सअपवर फिरणाऱ्या संदेशामुळे शेअर बाजारात झालेल्या उलथापालथीमुळे गुंतवणूकदारांना 9200 कोटी रुपयांचा फटका बसला. काही वर्षांपूर्वी गाजलेल्या सत्यम कॉम्प्युटर्स प्रकरणानंतर एका दिवसात शेअर बाजारात एवढी उलथापालथ घडण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.
व्हाट्सअपच्या संदेशामुळे गुंतवणूकदारांना 9200 कोटींचा फटका
या संदेशात इन्फिबीम अव्हेन्यूज या कंपनीच्या लेखा परीक्षणाबाबत काही शंका व्यक्त करण्यात आल्या होत्या. त्यामुळे शेअरचे भाव 70.24 टक्क्यांनी कोसळले. गुरुवारी या कंपनीचे भांडवली मूल्य 13,105 रुपये होते ते एकदम 3900 रुपयांवर आले. गुरुवारी कंपनीच्या एका शेअरचा भाव 138.75 रुपये होतो तो 58.80 रुपयांवर आला. इन्फिबीम अव्हेन्यूज ही शेअर बाजारात नोंदणी झालेली भारतातील पहिली ई-कॉमर्स कंपनी आहे. शनिवारी कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा होती. त्यापूर्वी हा संदेश पसरला.
इक्विरियस या ब्रोकरेज कंपनीच्या नावाने हा संदेश आला होता. इन्फिबीम अव्हेन्यूज कंपनीने नकारात्मक संपत्ती असलेल्या एका उपकंपनीला व्याजमुक्त आणि असुरक्षित कर्ज दिले असल्याचे या संदेशात म्हटले होते.
शेअरच्या किमतीमध्ये घसरण झाल्यामुळे इन्फिबीमने स्पष्टीकरण दिले मात्र त्याचा काही परिणाम झाला नाही.
“कंपनीने एनएसआय इन्फिनियम ग्लोबल या उपकंपनीला तिच्या स्थापनेपासून व्याजमुक्त आणि असुरक्षित कर्ज दिले आहेत. ही कर्जे अल्प मुदतीची असून मागणीनुसार ती परतफेड करायची आहेत. एनएसआय आपल्या कामकाजासाठी आणि व्यापारासाठी त्यांचा वापर करत आहे,” असे कंपनीच्या एका प्रवक्त्याने इकॉनॉमिक टाईम्स वृत्तपत्राला सांगितले.