गुजरातेतील हिरे व्यापाऱ्याने कर्मचाऱ्यांना दिल्या मर्सिडिस गाड्या भेट

benz
आपल्याकडे कामाला असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी तिघांना ‘मर्सिडिस-बेंझ जीएलएस’ या एसयुव्ही गाड्या भेट देऊन गुजरातेतील हिऱ्यांचे व्यापारी सावजी ढोलकिया पुन्हा एकदा सर्वांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांच्या हिरे व्यापाराला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सावजी ढोलकिया यांनी त्यांच्याकडे कामाला असणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना मर्सिडिस गाड्यांची महागडी भेट दिली आहे. या गाड्यांची किंमत तीन कोटींच्या घरात आहे. सावजी ढोलकिया यांच्या कंपनीला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, मोठा समारंभ सुरतमध्ये आयोजित केला गेला होता. या समारंभामध्ये या भेटी ढोलकिया यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिल्या. या तीनही गाड्यांमध्ये पॅनोरामिक सनरूफ, थ्री झोन क्लायमेट कंट्रोल, रियर सीट एन्टरटेनमेंट सिस्टम इत्यादी सुविधा देण्यात आल्या आहेत.
benz1
सावजी ढोलकिया यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना इतक्या महागड्या भेटी देण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. या पूर्वी देखील सावजी ढोलकिया यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना २०१७ साली नववर्षानिमित्त डॅटसन-गो गाड्या भेट म्हणून दिल्या होत्या. तर २०१६ साली दिवाळीनिमित्त आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी सावजी ढोलकिया यांनी तब्बल ५१ कोटी रुपये खर्च केले होते. या निमित्त सावजी यांनी १२६० गाड्या आणि चारशे सदनिका भेट म्हणून आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या. त्या आधीच्या वर्षी देखील ढोलकिया यांनी ४९१ गाड्या आणि २०० सदनिका आपल्या कर्मचाऱ्यांना भेट म्हणून दिल्या होत्या.
benz2
कर्मचाऱ्यांची गुणवत्ता आणि त्यांचे कसब या गुणांच्या नुसार या भेटी दिल्या जात असल्याचे ढोलकिया म्हणतात. आपल्या कामाच्या बदल्यात इतक्या चांगल्या भेटी कर्मचाऱ्यांना मिळत असल्यामुळे तेही अतिशय उत्साहाने आणि आनंदाने काम करण्यास तयार असणे सहाजिकच आहे. सावजी ढोलकिया हे हरे कृष्ण एक्सपोर्टर्स या कंपनीचे मालक असून, ही कंपनी हिरे आणि कपड्याचा व्यापार करीत असते. या कंपनीचे वार्षिक ‘टर्न ओव्हर’ सहा हजार कोटीच्या घरात आहे.
benz3
ज्या कर्मचाऱ्यांनी ढोलकिया यांच्या कंपनीमध्ये वर्षानुवर्षे निष्ठेने काम केले आहे, अश्या कर्मचाऱ्यांना ढोलकिया विशेष भेटी देत असतात. त्याचप्रमाणे अश्या भेटी मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांना काम करण्यास आणखी हुरूप येत असून त्यांना मेहनत करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे ढोलकिया म्हणतात. मालक आणि कर्मचारी यांचे संबंध कसे असावेत, आणि कर्मचाऱ्यांनी संपूर्ण निष्ठेने आणि आनंदाने काम करावे असे वातावरण निर्माण कसे व्हावे याचे उदाहरण सावजी ढोलकिया यांनी सर्वांसमोर ठेवले आहे.

Leave a Comment