येथे प्राण्यांवरही चालविले गेले खटले, दिली अघोरी शिक्षा

animal
जगभरामध्ये प्रत्येक देशाची स्वतःची वेगळी अशी न्यायव्यवस्था आणि कायदे आहेत. पण हे कायदे त्या देशांच्या नागरिकांसाठी आहेत. या कायद्यांचे उल्लंघन केल्यास त्यासाठी योग्य ते शासन केले जाण्याची प्रावधाने देखील कायद्यामध्ये आहेत. मात्र हे कायदे यंत्रे, आणि प्राण्यांकरिता लागू नाहीत. पण जगाच्या इतिहासामध्ये असे ही काही किस्से घडून गेले आहेत, जिथे प्राण्यांवर कायदेशीर खटले चालविले गेले आणि त्यांना अघोरी शिक्षा देखील सुनाविल्या गेल्या. १९०६ साली लंडन येथे वास्तव्यास असणाऱ्या विल हेन्मन यांनी प्रकाशित केलेल्या ‘क्रिमिनल प्रॉसिक्युशन अँड कॅपिटल पनिशमेंट्स फोर अॅनिमल्स’ नामक पुस्तकामध्ये प्राण्यांवर चालविल्या गेलेल्या खटल्यांचे उल्लेख सापडतात.

या पुस्तकामध्ये उल्लेखलेली घटना १४७४ साली एका कोंबड्यावर चालविल्या गेलेल्या खटल्याची आहे. निसर्गाचे चमत्कार अनेक बाबतीत पाहायला मिळतात तसाच एक चमत्कार या कोंबड्याच्या बाबतीतही घडला. या कोंबड्याने चक्क अंडे दिले. घडलेल्या प्रकाराला अनैसर्गिक म्हणून करार देत या कोंबड्याला जबाबदार धरीत त्याला जिवंत जाळण्याची शिक्षा स्वित्झर्लंडच्या न्यायालयाने सुनाविली होती.
animal1
सोळाव्या शतकामध्ये घडलेली ही घटना फ्रांस देशातील आहे. फ्रान्सच्या एका गावातील शेतांमधील पिकांचे नुकसान करण्याचा आरोप एका उंदरावर लावला गेला होता. या उंदराविरुद्ध खटला उभा राहिला आणि उंदराच्या बचावार्थ वकिलाची नेमणूक देखील करण्यात आली. उंदीर खटल्याच्या सुनावणीकरिता अनुपस्थित का आहे, असा प्रश्न न्यायमूर्तीनी विचारल्यावर, गावातील सर्व मांजरींपासून उंदराच्या जीवाला धोका असल्याचा युक्तिवाद उंदराच्या वकिलांनी केला होता. या खटल्यातून उंदीरमामांची निर्दोष मुक्तता करण्यात अली होती.

अमेरिकतील टेनेसी राज्यामध्ये एका हत्तीला सर्वांसमक्ष फाशी देण्याची अघोरी शिक्षा सुनाविण्यात आली होती. ही घटना १९०६ साली घडली. एका सर्कशीमध्ये करतब दाखविणाऱ्या या हत्तीने, खेळांचे प्रशिक्षण सुरु असताना आपल्या प्रशिक्षकाला पायदळी तुडवून ठार मारल्याचा आरोप या हत्तीवर होता. या आरोपासाठी शासन म्हणून हत्तीला सर्वांसमक्ष फाशी देण्याची शिक्षा न्यायालयाने फर्माविली होती. सतराव्या शतकामध्ये ब्राझीलमधे खटला उभा राहिला तो लाकडे फस्त करणाऱ्या वाळवीविरुद्ध. एका चर्च मधील लाकडी भिंती आणि इतर लाकडी वस्तू पोखरून टाकणाऱ्या या वाळवीविरुद्ध खटला उभा राहिला होता.

१३८६ साली आणि १४९४ साली दोन जंगली रानडुकरांच्या विरुद्ध खटले भरले गेले होते. या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन्ही रानडुकरांनी लहान मुलांवर जीवघेणे हल्ले केले होते. या अपराधांसाठी या दोन्ही रानडुकरांना फाशीची शिक्षा सुनाविण्यात आली होती.

Leave a Comment