कार्डावर कुत्र्याचे नाव घालून वर्षभर घेतले रेशन

retion
केंद्र सरकारने आधार सक्ती केल्यानंतर आधारची गरज कुठे आहे आणि कुठे नाही याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला असताना आधारचा फायदा कसा होऊ शकतो याचे उदाहरण नुकतेच समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशच्या धार जिल्ह्यात एका इसमाने त्याच्या पाळीव कुत्र्याचे नाव रेशन कार्डवर घालून वर्षभर धान्य घेतल्याचे समोर आल्यामुळे सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या प्रकरणाचा तपास त्वरित सुरु करण्याचे आदेश दिले गेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार नरसिंग नावाच्या माणसाने रेशनकार्डावर स्वत. पत्नीचे नाव घालताना पाळीव कुत्रा राजूचे नावही मुलगा म्हणून घातले. वडिलांचे नाव म्हणून स्वतःचे नाव दिले आणि या कुत्र्याच्या नावाने वर्षभर दरमहा ४ किलो गहू, १ किलो तांदूळ असे धान्य घेतले. जेव्हा रेशन कार्डला आधार कार्ड जोडण्याची सक्ती झाली तेव्हा नरसिंग याने स्वतःचे व बायकोचे आधार कार्ड दिले पण राजूचे आधार कार्ड देण्यास टाळाटाळ केली तेव्हा खरा प्रकार उजेडात आला. राजूला मी मुलासारखा सांभाळतो असा युक्तिवाद त्याने केला असला तरी रेशन कार्ड देताना कोणत्याची कागदपत्राची पडताळणी न करताच ग्रामपंचायतीने ते दिले असल्याचे स्पष्ट झाले.

Leave a Comment