वर्षातून केवळ बाराच तासांसाठी खुले होणारे लिंगेश्वरी मंदिर

temple
भारतामध्ये पौराणिक महत्व असलेली अनेक प्राचीन मंदिरे आहेत. छत्तीसगड जिल्ह्यातील कोंडागाव येथील अलोर गावामध्ये माता लिंगेश्वरीचे मंदिर देखील अतिप्राचीन आहे. छत्तीसगड राज्यामध्ये सर्वत्र या मंदिराची ख्याती असली, तरी या राज्याबाहेर मात्र या मंदिराची ओळख फारशी आढळत नाही. तसे या मंदिरामध्ये भाविकांचे येणे जाणे देखील मर्यादितच आहे. या मंदिराची विशेषता अशी, की हे मंदिर वर्षातून केवळ एकदाच, तेही केवळ बारा तासांच्या अवधीपुरतेच खुले केले जाते. दर वर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल नवमीच्या दिवशी हे मंदिर भाविकांसाठी खुले केले जाते. या मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना येथे पोहोचण्यासाठी बिकट वाटपार करावी लागते.
temple1
छत्तीसगड राज्याच्या ज्या भागामध्ये हे मंदिर आहे, तो भाग अतिशय दुर्गम असून, त्या भागामध्ये नक्सलवादी सक्रीय असल्याने या ठिकाणी भाविकांचे एरव्ही फारसे येणेजाणे नाही. या ठिकाणी असलेल्या निबिड अरण्यातून वाट काढीत अलोर नामक गावापर्यंत पोहोचावे लागते. या गावामध्ये लहान टेकडीवर मोठमोठ्या शिळा आहेत. या शिळांमुळे येथे एक लहानशी गुहा बनली आहे. या गुहेच्या तोंडाशी एक अनेक लहान दगड आहेत. मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी या गुहेच्या तोंडाशी असलेले लहान दगड हटवून त्या अरुंद भुयारामध्ये शिरावे लागते. या ठिकाणी गुहेच्या मधोमध दोन फुट उंचीचे शिवलिंग आहे. या मंदिरामध्ये देवी लिंगरुपामध्ये विराजमान असल्याची मान्यता असल्यामुळे येथील देवतेला लिंगेश्वरी म्हटले जाते.
temple2
या मंदिरातील देवतेला नैवेद्य म्हणून काकडी अर्पण केली जाते. काकडी देवतेच्या चरणी ठेवून एखाद्या गोष्टीची कामना केल्यावर ही मनोकामना पूर्ण होत असल्याचे स्थानिक रहिवासी सांगतात. त्यामुळे दर्शनासाठी जेव्हा हे मंदिर खुले होते, तेव्हा मंदिराच्या बाहेर काकडीचा विक्रय करणारे लहानमोठे विक्रेते येथे दिसतात. येथे प्रसाद म्हणूनही काकडीच भाविकांना दिली जाते. विशेषतः ज्या दाम्पत्याला अपत्यसुख नाही अश्या दाम्पत्याने येथे काकडीचा नैवेद्य दाखविल्यास त्यांची अपत्यसुखाची इच्छा पूर्ण होते अशी मान्यता येथे आहे.

Leave a Comment