मुकेश अंबानी रोज कमवतात तब्बल ३०० कोटी रुपये

mukesh-ambani
मुंबई – देशात सर्वात श्रीमंत व्यक्ती रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी ठरले असून भारतातील श्रीमंताची यादी बार्कलेज हुरुन इंडियाने मंगळवारी जाहीर केली. त्यानुसार, वर्षभरात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सच्या किमतीत ४५ टक्के वाढ झाली. वर्षभरात अंबानी यांच्या मिळकतीत दररोज ३०० कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

३ लाख ७१ हजार कोटी एवढी मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती असून, ते श्रीमंतांच्या या यादीत सलग सातव्या वर्षी अग्रस्थानी आहेत. त्यांची संपत्ती दुसऱ्या, तिस-या आणि चौथ्या क्रमांकावरील श्रीमंतांच्या एकूण संपत्तीहूनही अधिक आहे. बार्कलेज हुरुन इंडियाच्या यादीत ज्यांची संपत्ती १ हजार कोटी रुपयांहून अधिक आहे, अशा भारतीय श्रीमंतांचा समावेश करण्यात आला आहे.

गेल्या वर्षीच्या यादीच्या तुलनेत २०१८च्या यादीत एक तृतियांश अधिक व्यक्तींचा समावेश झाला आहे. अशा प्रकारे २०१७मध्ये या यादीत ६१७ लोकांचा समावेश होता. पण ही संख्या यावर्षी ८३१वर पोहोचली आहे. श्रीमंतांची ही संख्या २०१७मधील श्रीमंतांच्या तुलनेत २१४ने अधिक आहे. यादीत समावेश असलेल्या श्रीमंत व्यक्तींची संपत्ती ७१९ अब्ज डॉलर इतकी असून ती देशाच्या २८५० अब्ज डॉलर इतक्या जीडीपीच्या एक चतुर्थांश असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

Leave a Comment