चारशे निरनिराळे प्राण्यांना आपल्या घरामध्ये आसरा देणारा प्राणीप्रेमी

animal
या घरामधील जेवणघरातील टेबलावर फळांच्या किंवा अन्नपदार्थांच्या ऐवजी चक्क एक भला मोठा कोब्रा सरपटताना तुम्हाला दिसेल, तर घराच्या बागेमध्ये पन्नास किलो वजनाचे एक लहान कासव संथ गतीने फिरताना दिसेल. इतकेच नाही, तर झोपण्याच्या खोलीमध्ये पलंगावर दोन मोठ्या मगरी आराम करताना देखील आढळतील. हे वर्णन एखाद्या प्राणीसंग्रहालयाचे नाही, तर एका व्यक्तीच्या घराचे आहे. चारशे निरनिराळे प्राणी असलेले हे घर फ्रांसमधील नान्ते या ठिकाणी असून, हे घर ६७ वर्षीय फिलीप जिलेट यांचे आहे.
animal1
फिलीप यांचे घर चारशे निरनिराळ्या वन्य जीवांसाठी आश्रयस्थान आहे. हे वन्य जीव पाहून येथे प्रथमच येणाऱ्या पाहुण्यांचा भीतीने थरकाप उडत असला तरी फिलीप मात्र गेली वीस वर्षे या प्राण्यांसोबत आनंदाने जीवन जगत आहेत. या जनावरांना राहण्यासाठी फिलीप यांनी आपल्या घरामध्ये अनेक कोनाड्यांचे निर्माण करविले आहे. या सर्व प्राण्यांना फिलीप आपल्या हाताने अन्न खाऊ घालत असून, अगदी स्वतःच्या मुलांप्रमाणे फिलीप या प्राण्यांची देखभाल करीत असतात.
animal2
जनावरांचे वर्तन आपल्याला समजत नाही, म्हणूनच आपल्याला त्यांची भीती वाटत असून, त्याच कारणापायी आपण जनावरांशी वाईट वर्तणूक करीत असल्याचे फिलीप यांचे म्हणणे आहे. जनावरे आपल्याला अपाय करतील या भीतीपोटी आपण त्यांचे नुकसान करायला बघतो. पण वास्तविक एकदा एखाद्या प्राण्याचे वर्तन लक्षात घेतले व त्यानुसार त्याला वागविल्याने त्या प्राण्यापासून आपल्याला कोणताही अपाय नसल्याचे फिलीप म्हणतात. फिलीप यांच्याकडे दोन मगरी असून, त्यांनी यांची नावे ‘अॅली’ आणि ‘गेटर’ ठेवली आहेत. या मगरींना चामडे बनविणाऱ्या कारखान्यातून वाचवून फिलीप यांनी आपल्या घरामध्ये आणले आहे.
animal3
या निरनिराळ्या प्राण्यांना घरामध्ये ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर परवानग्या फिलीप यांच्याकडे असून, अधून मधून एखाद्या प्राण्यांच्या प्रदर्शनामध्ये फिलीप आपल्या प्राण्यांसह सहभागी होत असतात. लोकांचे प्राण्यांच्या प्रती मनामध्ये असलेले भय आणि गैरसमज दूर होऊन, प्राण्यांच्या सुरक्षिततेच्या प्रती लोकांच्या मनामध्ये आस्था निर्माण व्हावी आणि त्यांनी प्राण्यांना प्रेमाने वागवावे हा फिलीप यांचा हेतू आहे. फिलीप यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनाही आता फिलीप यांच्या घरातील या सदस्यांची सवय झाली आहे. या प्राण्यांच्या सोबत काही वेळ घालविता यावा याकरिता फिलिपचे शेजारी त्यांच्या घरी येत असतात.
animal4

Leave a Comment