अबब ! सव्वा अब्ज रुपयाचे बूट

juti
बुधवारी युएइ दुबई मध्ये जगातील सर्वात महागडा रत्नजडीत बूट जोड सादर केला जात असून या जोडाची किंमत १.७० कोटी डॉलर्स म्हणजेच ६.२४ कोटी दिरहाम म्हणजे आपल्या भारतीय रुपयात चक्क १ अब्ज २३ कोटी रुपये आहे. खलीज टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार या बुटात अतिशय मौल्यवान हिरे आणि बावनकशी सोने वापरले गेले असून ते तयार करण्यासाठी ९ महिने लागले आहेत. पॅशन डायमंड शु असे त्याचे नामकरण केले गेले आहे.

दुबईतील नामवंत पादत्राणे ब्रांड जदा दुबईने पॅशन ज्वेलर्सचा सहकार्याने हा बूट जोड बनविला असून तो जगातील एकमेव सप्ततारांकित हॉटेल बुर्ज अल अरब येथे पेश केला जाणार आहे. सध्या हा बूट ३६ इयू साईझचा असला तरी जो ग्राहक तो खरेदी करेल त्याच्या पायाच्या आकारानुसार तयार करून दिला जाणार आहे. जदा दुबईच्या सहसंस्थापिका मारिया मजरी म्हणाल्या त्यांची कंपनी फक्त हिरेजडीत पादत्राणे तयार करते. आमचा हा दुसरा संग्रह आहे. जगात अद्भुत आणि बहुमूल्य हिऱ्यांचा वापर वाढत चालला आहे. आमच्या या प्रदर्शनला ५० निमंत्रित आहेत त्यात व्हीआयपी, धनाढ्य आणि काही पत्रकार असतील.