स्वयंपाकामध्ये उपयोगी पडतील अश्या काही सोप्या टिप्स

tips
उत्तम स्वयंपाक करता येणे ही कला असून, ही आजच्या काळामध्ये केवळ गृहिणींच्या पुरतीच मर्यादित नाही. आजच्या काळामध्ये महिलांप्रमाणेच पुरुष, आजची तरुणाई आणि मुले देखील स्वयंपाकामध्ये नवनवीन पदार्थ बनविण्याचा आनंद घेऊ लागले आहेत. स्वयंपाक करताना काही साध्या सोप्या टिप्समुळे स्वयंपाकामध्ये नक्कीच मदत मिळू शकते. त्यामुळे या टिप्सचा अवलंब करून आपली पाककला आणखी विविधरंगी करण्यास सहाय्य मिळेल.
tips1
लहान मुलांना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मिल्क शेक्स घेणे आवडते. त्याकरिता घरामध्ये नेहमी ताजी फळे असावीत. पण क्वचित कधी घरामध्ये फळे नसल्यास एक मोठा चमचा मिक्स्ड फ्रुट जॅम थंड दुधामध्ये घालून ते मिश्रण ब्लेंडरमध्ये घुसळून घ्यावे. मुलांसाठी थंडगार मिल्कशेक तयार ! अनेकदा प्रवासाला निघताना वाटेत खाण्यासाठी बरोबर काहीतरी घेणे सोयीचे वाटते. त्यासाठी एक सोपी आणि चटपटीत रेसिपी करून पहावी. गव्हाच्या पिठामध्ये दोन चमचे लोणच्याचा मसाला, दोन चमचे लोणच्यातले तेल, आणि थोडेसे मीठ व ओवा घालून पीठ मळावे. या पिठाच्या पुऱ्या कराव्यात. या ‘अचारी’ पुऱ्या चविष्ट लागतातच, शिवाय प्रवासामध्ये टिकून राहतात. लोणचे घातल्यानंतर लोणच्याचा मसाला शिल्लक राहिल्यास तो मसाला भाजी करताना त्यामध्ये वापरता येऊ शकतो. हा मसाला वापरून अचारी भेंडी, अचारी गोभी इत्यादी भाज्या बनविल्या जाऊ शकतात.
tips2
जेवणामध्ये इतर पदार्थांच्या जोडीने ओली चटणी ही बनविली जाते. या चटणीमध्ये लिंबाच्या ऐवजी पिकेलेले संत्रे किंवा हिरवे सफरचंद देखील वापरता येईल. यामुळे चटणी आणखी स्वादिष्ट बनेल आणि पौष्टिकही. जर एखादी रसभाजी बनविताना ग्रेव्ही अधिक तिखट झाली, तर त्यामध्ये थोडे दही घालावे, किंवा थोडे साजूक तूप घालावे, त्याने ग्रेव्हीचा तिखटपणा कमी होण्यास मदत होते. जर गुलाबजाम बनविले आणि काही कारणामुळे ते पाकात मुरूनही कडकच राहिले, तर पाकासकट गुलाबजाम प्रेशर कुकर मध्ये घालावेत आणि पाच मिनिटे मध्यम आचेवर शिजू द्यावेत. यामुळे गुलाबजाम नरम होतील.
tips3
ज्या गृहिणी लाल तिखट, म्हणजेच मिरची पूड घरीच बनवीत असतील, त्यांच्यासाठी ही टीप आहे. मिरच्या मिक्सरवर वाटताना त्यामध्ये थोडेसे मोहोरीचे तेल घातल्याने मिरची पुडीला चांगला रंग येतो. फोडणीमध्ये हिंग नेहमीच वापरला जातो. पण कधी हिंग पूड कडक होऊन जाते. अश्यावेळी या हिंगासोबत एक हिरवी मिरची ठेवावी. त्यामुळे कडक झालेला हिंग परत मोकळा होईल. पनीर किंवा कोफ्त्यांसाठी ग्रेव्ही बनविताना त्यामध्ये पाण्याऐवजी दुधाचा वापर करावा. त्यामुळे ग्रेव्ही अतिशय चविष्ट बनते. अनेकदा घरामध्ये साठविलेल्या बटाट्यांना कोंब येऊ लागतात. अश्या वेळी बटाट्याच्या बास्केटमध्ये एखादे सफरचंद ठेवावे. त्यामुळे बटाटे अनेक दिवस ताजे राहतील आणि त्यांना कोंब फुटणार नाहीत.

बटाट्याचे पराठे, म्हणजेच आलू पराठे बनविताना सारण जर ओले राहिले तर पराठे लाटताना ते फाटून सारण बाहेर येण्याची शक्यात असते. अश्या वेळी बटाट्याच्या स्टफिंगमध्ये ब्रेडचा चुरा (क्रम्ब्स) घालवेत. त्यामुळे पराठे लाटताना फाटून सारण बाहेर येणार नाही. जर कॉफी जास्त बनविली गेली असेल, तर ती टाकून न देता आईसक्यूब ट्रेमध्ये घालून फ्रीज करावी. पुढच्या वेळी कोल्ड कॉफी बनविताना या कॉफी आईस क्युब्सचा वापर करता येईल. इडली नरम, मुलायम बनविण्याकरिता इडलीच्या पिठामध्ये एक लहान चमचा व्हिनेगर घालावे. त्यामुळे इडली अतिशय नरम बनते.

Leave a Comment