कहाणी गोव्याच्या सुप्रसिद्ध ‘फेनी’ची

feni
गोवा म्हटले की डोळ्यासमोर सुंदर समुद्रकिनारे, टुमदार घरे, पर्यटकांची अलोट गर्दी, चविष्ट सी फूड आणि पोर्तुगीझांचा प्रभाव असलेली जीवनशैली व खाद्यसंस्कृती, हे चित्र आपल्या डोळ्यांसमोर हमखास उभे राहते. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीज गोव्यामध्ये आले. त्यांच्याबरोबर त्यांनी पोर्तुगालमधील अनेक भाज्या आणि फळे आणली. आज आपल्या आहाराचा अविभाज्य भाग असलेले अनेक खाद्यापदार्थ वास्तविक पोर्तुगीझांच्या सोबत भारतात आले आहेत. बटाटे, टोमाटो, मिरच्या, अननस आणि काजू हे पोर्तुगीझांबरोबर भारतामध्ये आलेल्या अनेक पदार्थांपैकी आहेत. काजू वास्तविक ब्राझीलमध्ये पिकविला जात असे, त्याकाळी ब्राझील पोतृगीझांच्या अधिपत्याखाली होते. जेव्हा पोर्तुगीज भारतामध्ये, गोव्यामध्ये आले, तेव्हा त्यांनी तेथील जमीन काजूच्या लागवडीसाठी उत्तम असल्याचे ओळखून तिथे काजूची लागवड सुरु केली. किंबहुना ब्राझील मध्ये काजूंची होत असे, त्यापेक्षा उत्तम पैदास गोव्यामध्ये होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
feni1
जसजशी काजूची लागवड वाढू लागली, तसतसे काजू मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होऊ लागले. हेच काजू आंबवून त्यापासून ‘फेनी’ हे मद्य तयार केले जाऊ लागले. फेनी हे मद्य काजूंपासून तयार करण्याची कल्पना सर्वप्रथम कोणाला सुचली, याचा इतिहासामध्ये स्पष्ट उल्लेख सापडत नसला, तरी काही १७४० सालच्या पोर्तुगीज इतिहासकारांच्या लेखनामध्ये काजू आंबवून त्यापासून फेनी हे मद्य तयार केले जात असल्याचे उल्लेख सापडतात. या साठी काजूंची फळे वापरली जातात. हे मद्य तयार होऊ लागल्यापासून स्थानिक निवासी या मद्याच्या सेवनाला प्राधान्य देऊ लागल्याने, आणि त्यामुळे पोर्तुगीझ सरकारला विदेशी मद्यविक्रीमध्ये नुकसान होऊ लागल्याने, पोर्तुगीझ ‘फेनी’ वर काहीसे नाराजच असत.
feni2
फेनी हा शब्द, संस्कृत शब्द ‘फेना’ या शब्दावरून आला आहे. फेना या शब्दाचा अर्थ फेस असा असून, हे मद्य बाटलीतून ओतल्यानंतर त्यावर फेस येत असल्याने या मद्याला फेनी असा नाव पडल्याचे म्हणतात. काजूचे फळ तोडल्यानंतर फेनी बनविण्याची जटील प्रक्रिया सुरु होते. पूर्वीच्या काळी या फळांमधील बिया काढून टाकून त्यानंतर ही फळे खळात कुटून त्यांतला रस काढला जात असे. पण आताच्या काळामध्ये काजूच्या फळांमधून रस काढण्यासाठी मशीन्सचा वापर केला जातो. या मशीन्सना ‘पिंजरा’ म्हटले जाते. काही तास ही फळे कुटली गेल्यानंतर या फळांचा लगदा एका जड दगडाखाली ठेवण्यात येतो, जेणेकरून फळांतील सर्व रस निघून यावा. या रसाला ‘नीरो’ म्हटले जाते. हा ताजा रस अतिशय स्वादिष्ट असून, यामध्ये अल्कोहोल नसते.
feni3
‘नीरो’ काढून झाल्यानंतर हा नीरो मोठमोठ्या मडक्यांमध्ये भरून ठेवला जातो. स्थानिक भाषेमध्ये या मडक्यांना ‘कोडेम’ म्हटले जाते. या कोडेममध्ये भरलेला रस आंबविण्यास ठेवण्यात येतो. या प्रक्रियेला साधारण तीन दिवसांचा अवधी लागतो. या रसावर फेस दिसणे बंद झाले, की रस आंबला हे ओळखता येते. त्यानंतर या रसाच्या ‘डीस्टीलेशन’चे काम सुरु होते. युरॅक आणि कॅझुलो वापरून ही प्रक्रिया केली जाते. त्यानंतर फेनी तयार होते, तेव्हा त्यामध्ये अल्कोहोलची मात्रा सुमारे ४६% असते. अश्या प्रकारे गोव्याची प्रसिद्ध फेनी तयार केली जाते.

Leave a Comment