दातदुखीने त्रस्त आहात? मग आजमावून पहा हे उपाय

tooth
दातांचे दुखणे हे अतिशय अस्वस्थ करणारे दुखणे आहे. दाताला लागून राहिलेली बारीकशी कळ देखील चित्त विचलित करण्यासठी पुरेशी असते. एकदा का दाताचे दुखणे सुरु झाले, तर कोणत्या कामामध्ये लक्ष केंद्रित करणे अशक्य होऊन बसते. अनेकदा ही दातदुखी इतकी अचानक उद्भविते, की त्याक्षणी त्वरीत डॉक्टरांकडे जाणेही शक्य नसते. अश्या वेळी डॉक्टरांकडे पोहोचेपर्यंत काही घरगुती उपाय आजमाविल्याने दातदुखीपासून तात्पुरता आराम मिळू शकतो. या उपायांसाठी वारण्यात येणाऱ्या सर्व वस्तू संपूर्णपणे नैसर्गिक आणि वापरण्यास सुरक्षित असून, त्यांपासून कोणत्याही प्रकारचा अपाय संभवत नाही.
tooth1
पेरूच्या झाडाची दोन तीन पाने स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यावीत. त्यानंतर थोडे पाणी उकळून घेऊन एका ग्लासमध्ये काढून घ्यावे. त्यामध्ये ही पाने बुडवून ठेवावीत आणि त्यामध्ये अर्धा लहान चमचा समुद्री मीठ घालावे. हे मिश्रण पंधरा मिनिटे ठेऊन त्यानंतर त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. जर हिरड्यांवर सूज आल्याने वेदना होत असतील, तर या मिश्रणाने गुळण्या केल्यानंतर सूज कमी होण्यास मदत होते. तसेच वेदना देखील शमते. पेरूच्या पानाप्रमाणेच कांद्याचा रसही वेदनाशामक आहे. कांद्याचा लहानसा तुकडा दुखऱ्या दातावर ठेवून त्याचा रस निघेल अश्या बेताने हलकेच चावावा. त्यामुळेही दातदुखीमुळे होणारी वेदना शमते.
tooth2
जर काही कारणाने हिरड्यांना सूज येऊन त्यामधून रक्तस्राव होत असेल, तर निमगरम पाण्यामध्ये मीठ घालून त्याने गुळण्या केल्यास आराम मिळतो, शिवाय हे एक उत्तम नैसर्गिक माऊथवॉशही आहे. या पाण्याने गुळण्या केल्याने तोंडातील हानिकारक जीवाणू नष्ट होण्यास मदत होते आणि हिराड्यांवरील सूज घटते. तसेच दातदुखी सतावत असल्यास बर्फ एका मऊ कपड्यामध्ये लपेटून त्याने शेक घेतल्यासही आराम पडतो. मात्र बर्फ थेट त्वचेवर न लावता एखाया मऊ कपड्यामध्ये लपेटूनच शेक घ्यावा. या शेकामुळे सूज कमी होण्यासही मदत मिळते.
tooth3
लवंगेचे तेल दातदुखीवर अतिशय गुणकारी आहे. या तेलाचे दोन थेंब दुखऱ्या दातावर टाकल्याने दातातील वेदना कमी होण्यास मदत होते. जर हे तेल उपलब्ध नसेल, तर दोन तीन लवंगा दातांमध्ये धरून त्या हलकेच चावाव्यात. यामुळेही वेदना कमी होईल. लवंगेमध्ये युजनॉल नामक तत्व असून ह तत्व वेदना कमी करण्यास आणि सूज कमी करण्यास सहायक आहे. लवंगेप्रमाणेच एक लसुणाची पाकळी कुटून घेऊन ती दातावर ठेवल्यानेही वेदना कमी होण्यास मदत मिळते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment