‘मोलकरणी विकायला’ काढल्यामुळे दोन देशांमध्ये तणाव!

maid
इंडोनेशियातील मोलकरणी विकायला काढण्याच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्यामुळे इंडोनेशिया आणि सिंगापूर या दोन देशांमध्ये तणाव निर्माण झाल्या आहे. अशा जाहिराती सिंगापूरमधील काही संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्या होत्या.

सिंगापूरमध्ये सुमारे अडीच लाख मोलकरणी राहतात. त्यातील बहुतांशी मोलकरणी या इंडोनेशिया किंवा फिलापाईन्स यांसारख्या गरीब देशांतील आहे. कारूसेल नावाच्या संकेतस्थळावर काही इंडोनेशियन मोलकरणी विक्रीसाठी उपलब्ध असल्याच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. काही जाहिरातींमध्ये तर या मोलकरणींची विक्री झाल्याचेही म्हटले होते.

“आम्ही या जाहिरातींचा तीव्र निषेध करतो आणि या प्रकारामागे असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी करतो,! असे मायग्रेंट केअर या इंडोनेशियातील गैर-सरकारी संस्थेचे कार्यकारी संचालक वाहयू सुसिलो यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले. मोलकरणींच्या स्वाभिमानावर हा आघात आहे आणि त्यांची ही अवमानना आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, सिंगापूरच्या कामगार मंत्रालयानेही या प्रकाराची दखल घेतली आहे. काही मोलकरणी चुकीच्या पद्धतीने विकण्यात येत असल्याचे मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे. आम्ही या जाहिराती मागे घ्यायला लावल्या आहेत आणि तपास सुरू केला आहे, असे मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या प्रकारामागे असलेल्या एम्प्लॉयमेंट एजन्सीचा परवाना रद्द करण्यात येईल, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.