चांद बावडी - एका रात्रीमध्ये बांधविलेली जगातील सर्वात खोल बाव - Majha Paper

चांद बावडी – एका रात्रीमध्ये बांधविलेली जगातील सर्वात खोल बाव

chand
भारताच्या इतिहासामध्ये अनेक मानवनिर्मित तलाव, आणि विहिरींचा उल्लेख आढळतो. आत उतरून जाता येईल अश्या पायऱ्या असणाऱ्या विहिरीला बाव म्हटले जाते. राजस्थान राज्यामध्ये अश्या अनेक मोठमोठ्या बावी बनविल्या गेल्या आहेत. विशेषतः ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा अभाव असे, त्या ठिकाणी जमिनीखाली पाणी लागेपर्यंत खोलवर खणून, पाण्याचे स्रोत म्हणून बाव बनविली जात असे. अनेक ठिकाणी काही घरांमध्ये केवळ त्या घरातील परिवारजनांच्या वापरासाठी बावी बनविल्या जात असत. या बावी खासगी असत. राजस्थानमध्ये जयपूर जवळील आभानेरी गावामध्ये असणारी चांद बावडी, सर्वात खोल बाव म्हणून ओळखली जाते. खास ही बावडी पाहण्यासाठी दूरवरून पर्यटक या लहानशा गावामध्ये येत असतात.
chand1
चांद बावडी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या बावीची खोली शंभर फुटांपेक्षा अधिक असून, या बावीचे निर्माण बाराशे वर्षांपूर्वी करविण्यात आले होते. या बावडीमध्ये आत उतरून जाण्यासाठी ३,५०० पायऱ्या आहेत. ज्याला पाणी हवे असेल त्याला या तीन हजारांहून अधिक पायऱ्या उतरून खाली जावे लागते. ही बावडी चौरस आकाराची असून, यातील चारांपैकी तीन कोपऱ्यांमध्ये पायऱ्या आहेत. येथील हवामान अतिशय उष्ण असून, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या बावडीमध्ये अतिशय कमी असण्याची शक्यता लक्षात घेऊन इतकी खोल बाव बनवविण्यात आली. पावसाळ्यामध्ये या बावडीमध्ये साठलेले पाणी ग्रामस्थांना वर्षभर पुरते.
chand2
या बावडीची रचना आणि बनावट भारतीय स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणावे लागतील. त्या काळच्या वास्तूकारांच्या बुद्धीचे आणि गुणवत्तेचे प्रतीक या बावेच्या रूपाने पाहायला मिळते. ही बाव ज्या गावामध्ये आहे ते आभानेरी गाव जयपूरपासून सुमारे नव्वद किलोमीटरच्या अंतरावर, जयपूर-आग्रा महामार्गावर आहे. या गावाची निर्माण राजा चांद यांनी करविले होते. त्या काळी हे गाव आभा नगरी म्हणून ओळखले जात असे. या बावडीचे निर्माण राजा चांद यांनी करविले असल्याने या बावडीला चांद बावडी म्हटले जाते. या बावडीमध्ये जसजसे खाली उतरत जाऊ, तसतसे तापमान कमी झाल्याचे जाणवू लागते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ही बाव अगदी वरपर्यंत भरते असे म्हणतात. या बावडीमध्ये दोन भुयारे असून, एका भुयाराचे नाव ‘अंधेरी’ आणि दुसऱ्या भुयाराचे नाव ‘उजाली’ असल्याचे स्थानिक रहिवासी सांगतात.

Leave a Comment