अबब ! तब्बल तीस किलो वजनाचा कोबी!

cabbage
ब्रिटनमधील एका ७५ वर्षीय शेतकऱ्याने तब्बल तीस किलो वजनाचा कोबी पिकवून सर्वांना अचंबित करून टाकले आहे. सध्या या विशालकाय कोबीची छायाचित्रे सोशल मिडीयावर झपाट्याने व्हायरल होत आहेत. ही छायाचित्रे पाहून, हा चमत्कार नक्की कसा काय घडला असावा असा विचार करून लोक आश्चर्यचकित होत आहेत. हा भला मोठा कोबी पिकविणाऱ्या शेतकऱ्याचे नाव नील इयान असून, इयानने तीस किलो वजनच्या कोबीचे प्रदर्शन नॉर्थ यॉर्कशायर येथील हॅरीगेट ऑटम फ्लॉवर शोमध्ये केले आहे.
cabbage1
तीस किलो वजनाचा कोबी पिकाविल्याबाद्द्ल इयान यांना या फ्लॉवरशो मध्ये पुरस्कारही प्राप्त झाला आहे. या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या इतर शेतकऱ्यांनी देखील इयानचे खूपच कौतुक करीत, इयान अतिशय हुशार शेतकरी असून, त्यांच्या हातांमध्ये किमया असल्याचे म्हटले आहे. तऱ्हे-तऱ्हेच्या मोठ्या आकाराच्या भाज्या पिकाविण्याचे कौशल्य इयान यांना अवगत आहे. या पूर्वीही अनेक किलो वजनाच्या निरनिराळ्या विशालकाय भाज्या इयान यांनी आपल्या शेतामध्ये पिकविल्या आहेत.
cabbage2
तीस किलो वजनाचा हा कोबी संपूर्णपणे जैविक पद्धतीने, कोणत्याही रसायनांचा वापर केल्याशिवाय पिकविला गेला असल्याचे इयान सांगतात. तसेच इतर भाज्यांच्या मानाने कोबी पिकविण्यास सर्वाधिक अवधी लागल्याचेही इयान म्हणतात. या भल्या मोठ्या कोबीच्या शिवाय इतरही भाज्या सध्या इयान यांच्या शेतामध्ये पिकत आहेत. या भाज्या देखील या कोबीप्रमाणेच आकाराने भल्यामोठ्या आणि वजनदार असणार आहेत. वजनाला सर्वात जड कोबी पिकाविण्याचा विश्वविक्रम अमेरिकेतील स्कॉट रॉब यांच्या नावे आहे. त्यांनी पिकविलेल्या कोबीचे वजन तब्बल ६२ किलो होते.