अॅमेझॉनवर आता क्रेडिट कार्डशिवाय इएमआयवर खरेदी करू शकता वस्तू

amazon
नवी दिल्ली – एका नवीन फिचरचा समावेश ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉन इंडियाने केला असून या फिचरचे नाव अमेझॉन पे इएमआय (Amazon Pay EMI), असे आहे. तुम्ही आता याद्वारे क्रेडिट कार्डशिवाय इएमआयवर वस्तू खरेदी करू शकता. Amazon Pay EMI असा अमेझॉनच्या संकेतस्थळावर पर्याय आहे. जे ग्राहक क्रेडिट कार्डचा वापर करत नाहीत, त्यांच्यासाठी कंपनीने हा खास पर्याय सुरू केला आहे. ज्या ग्राहकांकडे क्रेडिट कार्ड नाही तेही या पर्यायामुळे अॅमेझॉनवरुन खरेदी करू शकणार आहेत.

यासाठी तुम्हाला या पर्यायावर त्वरित क्रेडिट कार्ड मिळेल. तुम्ही ज्याद्वारे ईएमआयवर वस्तू खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचे डेबिट कार्ड लिंक करावे लागणार आहे. यानंतर इएमआयची किंमत आपोआप तुमच्या डेबिट कार्डमधून कापली जाणार आहे. ही सुविधा एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कॅनरा बँक, सीटी बँक आणि कोटक महिंन्द्रा बँक या बँकांच्या खातेदारांसाठी उपलब्ध आहे. ३ महिन्यांपासून १२ महिन्यांपर्यंत कालावधी ग्राहकांना ईएमआय भरायला मिळणार आहे. ८ हजारांपासून ते ६० हजारांपर्यंत Amazon Pay EMI वर ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. ही सुविधा केवळ अॅमेझॉन अॅपवर उपलब्ध आहे. या फिचरमध्ये एक्सचेंज ऑफरची सुविधा उपलब्ध नाही. ही सुविधा तुम्हाला फक्त सिंगल आइटम परचेसवर मिळणार आहे.

तुम्हाला यावर रजिस्टर करण्यासाठी तुमचा आधार आणि पॅन कार्ड क्रमांक द्यावा लागेल. यानंतर अकाऊंट वेरिफिकेशनसाठी तुमच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी क्रमांक येईल. हा क्रमांक टाकल्यानंतर तुमचे अकाऊंट वेरिफाईड होईल. लेंडिंग पार्टनरद्वारे यानंतर तुमची क्रेडिट लिमिट ठरवली जाईल. यानंतर ईएमआयच्या ऑटो रिपेमेंटसाठी तुम्हाला तुमचे डेबिट कार्ड लिंक करावे लागणार. या सर्व प्रक्रियेनंतर हे फिचर तुम्ही वापरु शकाल.

Leave a Comment