चुकीची वेळ दाखविण्यासाठीच प्रसिद्ध आहे हे घड्याळ

scotland
जगभरात अनेक ऐतिहासिक इमारतींवर बसविलेली घड्याळे आपण पाहिली असतील. त्यातील अनेक तर प्रसिद्धही आहेत. हि सारी घड्याळे वर्षानुवर्षे बरोबर वेळ दाखवीत आहेत. स्कॉटलंडची राजधानी एडिनबरो येथील बाल्मोरल हॉटेल वरील एक घड्याळ मात्र चुकीची वेळ दाखविण्यासाठी जगप्रसिद्ध आहे. हे घड्याळ अन्य घड्याळांच्या तुलनेत वेगाने धावणारे असून ते नेहमी तीन मिनिटे पुढे असते.

एडिनबरो हे शहर मुळात तेथील गोथिक शैलीच्या अनेक ऐतिहासिक इमारतींमुळे आणि स्कॉटीश जीवनशैली साठी प्रसिद्ध आहे आणि जगभरातील पर्यटकांचे आवडते स्थळ आहे. बल्मोराल हॉटेल वरील घड्याळ हे पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. ५८ मीटर उंचीच्या टॉवरवर हे घड्याळ १९०२ साली हे हॉटेल सुरु झाले तेव्हाच बसविले गेले आहे. हे घड्याळ तीन मिनिटे पुढे असण्यामागे एक कारण आहे.

असे सांगतात त्यावेळी येथील रेल्वेची जबाबदारी नॉर्थ ब्रिटीश रेल्वेकडे होती. रेल्वे कंपनीने प्रवासी उशिरा पोचू नयेत. त्यांना तिकीट काढण्यास पुरेसा वेळ मिळावा आणि सामानाची चढउतार आरामात करत यावी यासाठी हे घड्याळ तीन मिनिटे पुढे ठेवण्याची कल्पना लढविली. या घड्याळात ११६ वर्षात फक्त एकाच बदल झाला तो म्हणजे पूर्वी हे घड्याळ हाताने चालविले जात असे आता ते विजेवर चालते. अर्थात नवीन वर्षाची सुरवात होताना मात्र हे घड्याळ बरोबर वेळ दाखविते. त्यासाठी खास इंजिनीअर पाठविला जातो आणि तो नववर्षाची परेड वेळेवर सुरु व्हावी म्हणून घड्याळ तीन मिनिटे मागे करतो.

कालांतराने रेल्वेचे राष्ट्रीयीकरण झाले आणि या हॉटेलचे पूर्वीचे नाव बदलून ते बल्मोराल करण्यात आले असले तरी घड्याळाची खासियत मात्र जपली गेली आहे. दोन वर्षापूर्वी हे घड्याळ अचानक बंद पडले होते. विशेष म्हणजे स्मार्टफोन आणि स्मार्टवॉचच्या आजच्या काळातही स्कॉटलंडचे नागरिक याच घड्याळावर अधिक विश्वास ठेवतात.

Leave a Comment