अॅमेझॉनसोबत भागीदारी करून ऑडीने सादर केली पहिली इलेक्ट्रीक एसयूव्ही

audi
नवी दिल्ली – आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही ऑडी ई-ट्रोन जर्मनीची लक्झरी कार बनवणारी जगप्रसिद्ध कंपनी ऑडीने सादर केली असून कंपनीने या कारसाठी अॅमेझॉनसोबत भागीदारीही केली आहे. एलॉन मस्क यांच्या टेस्लासोबत ऑडीच्या या कारची थेट टक्कर असणार आहे.

ऑडी ई-ट्रोन ही पूर्णतः एसयूव्ही कार असून ही कार पुढील वर्षी अमेरिकेच्या बाजारात लॉन्च केली जाईल. त्यानंतर ही कार भारतातही लॉन्च होण्याची शक्यता आहे. लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात काही महिन्यांपूर्वी ऑडीने ही कार सादर केल्यापासून याबाबत चांगलीच चर्चा होती.

ऑडीने ही कार इलेक्ट्रीक गाड्यांच्या बाजारात आपला ठसा उमटवण्यासाठी आणली आहे. कंपनीने या कारसाठी अॅमेझॉनसोबत भागीदारी केली असून इलेक्ट्रीक चार्जिंगची सिस्टीम अॅमेझॉनवर विक्रीसाठी असेल, याशिवाय अॅमेझॉनकडून घरबसल्या मॅकेनिकची सुविधाही मिळेल.

या चार्जिंग सिस्टीमची किंमत ७२ हजार ९२५ रुपये असेल. एकदा फूल चार्ज केल्यानंतर ४०० किमीचा प्रवास करता येईल असे सांगितले जात आहे. ९५ kWh लिथियम आयन बॅटरी या कारमध्ये वापरण्यात आली असून ही बॅटरी अवघ्या ३० मिनिटांमध्ये ८०%चार्ज होईल, असा कंपनीचा दावा आहे. दोन पावरफुल इलेक्ट्रिक मोटार कारमध्ये असून हाय-व्होल्टेज टेक्नोलॉजी कार चालवण्याचा एक शानदार अनुभव मिळेल असे कंपनीने म्हटले असून या कारची किंमत ५५ ते ५६ लाखांच्या आसपास असेल.

Leave a Comment