शाही विवाहसोहळ्यासाठी अश्या प्रकारे बनविला होता केट मिडलटनचा पोशाख

Kate-Middleton
ब्रिटीश शाही परिवारातील प्रिन्स विलियम याची पत्नी केट मिडलटन, तिच्या सुंदर पोशाखांसाठी नेहमीच चर्चेत असते. किंबहुना, केटने परिधान केलेल्या पोशाखाच्या ‘रेप्लिका’ना ऑनलाईन मोठी मागणी असते, आणि हे पोशाख ऑनलाईन उपलब्ध होताच झटपट ‘आउट ऑफ स्टॉक’ देखील होऊन जातात. ब्रिटीश शाही परिवारातील सर्वच सदस्य अतिशय लोकप्रिय असून, ते काय करतात, कुठे जातात इथपासून काय खातात आणि कश्या प्रकारचे पेहराव करतात यावर प्रसारमाध्यमांची देखील नेहमीच बारीक नजर असते. केट मिडलटन हे शाही परिवारातील खासे व्यक्तिमत्व असल्याने पेहरावाची तिची निवड नेहमीच कौतुकाचा विषय ठरत आली आहे.
Kate-Middleton1
केट मिडलटनचा, तिने तिच्या विवाहासाठी परिधान केलेला पोशाखही खासच म्हणावा लागेल. ‘अॅलेक्झांडर मॅक्वीन’ या लेबल खाली सारा बर्टन यांनी डिझाईन केलेला हा ‘वेडिंग गाऊन’ ४३४,००० डॉलर्स किंमतीचा होता. उत्तम प्रतीचे रेशीम वापरून हा गाऊन बनविला गेला होता. तसेच अतिशय नाजूक, किंमती अशी लेस या पोशाखासाठी वापरण्यात आली होती. या पोशाखासोबत केटने अतिशय सुंदर, रत्नजडीत मुकुट परिधान केला होता. हा ‘हेलो टियारा’ राणी एलिझाबेथने केटला खास विवाहसोहोळ्यानिमित्त परिधान करण्यासाठी दिला होता. राणी एलिझाबेथला हा मुकुट, तिच्या अठराव्या वाढदिवसानिमित्त तिचे वडील राजे सहावे जॉर्ज यांच्याकडून भेट म्हणून मिळाला होता. या मुकुटामध्ये एक हजार लहान मोठे हिरे जडविलेले आहेत.
Kate-Middleton2
केट मिडलटनच्या गाऊनच्या आतील बाजूला एक लहानशी निळ्या रंगाची सॅटीन रिबन लावण्यात आली होती. विवाहसोहोळ्यासाठी अश्या प्रकारची सॅटीन रिबन शुभ समजली जाते. केट मिडलटनच्या पोशाखासाठी वापरण्यात आलेल्या लेसवर अनेक सुंदर, नाजूक फुलांचे नक्षीकाम केलेले होते. या प्रसंगी केटने परिधान केलेल्या पादत्राणांवरही नाजूक लेसने कलाकुसर केलेली होती. विववाहसोहोळ्यासाठी केटने परिधान केलेली हिऱ्यांची कर्णभूषणे तिच्या आईवडिलांनी भेट म्हणून दिलेली होती.

Leave a Comment