रत्नजडीत पटियाला नेकलेस – बहुमूल्य आणि दुर्मिळ

neckless
प्राचीन रत्नजडीत जड-जवाहीर म्हटले की प्रतिष्ठित राजघराण्यांच्या राण्या आणि इतर शाही स्त्रिया डोळ्यांसमोर उभ्या राहतात. पण या जडजवहीरांपैकी सर्वात बहुमूल्य समजला जाणारा पटियाला नेकलेस, एखाद्या राणीकरिता नाही, तर पटियालाचे महाराजे भूपिंदर सिंह यांच्याकरिता बनविला गेला होता. १९०९ ते १९३८ या काळामध्ये भूपिंदर सिंह हे पटियालाचे राजे होते.
neckless1
अतिशय बहुमूल्य आणि नजर ठरणार नाही अश्या विलक्षण सुंदर पटियाला नेकलेसची ख्याती जगभरामध्ये पसरली होती. त्याच्या मुख्य पदकामध्ये ‘डी बीअर्स’ हिरा जडविलेला आहे. हा हिरा जगातील सर्वात मोठ्या हिऱ्यांपैकी एक होता. त्यामुळे पटियाला नेकलेस जगामध्ये आजवर घडविल्या गेलेल्या सर्वात किंमती आभूषणांपैकी एक ठरला. पंजाबच्या समृद्ध भूमीवर राज्य करणारे, अतिशय संपन्न राज्याचे आणि अतिशय ऐषारामी जीवनशैली असलेले राजे महाराजा भूपिंदर सिंह यांनी हा नेकलेस स्वतःकरिता बनवविला होता.
neckless2
महाराजा भूपिंदर सिंह यांच्या जीवनशैली बद्दल बोलायचे झाले, तर त्यांची जीवनशैली सर्वार्थाने राजेशाही होती. त्यांचे निवासस्थान असलेल्या राजमहालामध्ये १२०० दालने होती. राजे भूपिंदर सिंह यांना तीनशे राण्या असून, त्याही त्यांच्या समवेत या भव्य महालामध्ये राहत असत. १९२६ साली राजे भूपिंदर सिंह यांनी पॅरिस येथील ‘कार्टीयर’ यांना आपल्या संग्रही असणारी रत्ने देऊन त्यातून एक सुंदर हार बनविण्यास सांगितले. असंख्य तेजस्वी माणिक, पाचू आणि हिरे आणि मुख्य पदकामध्ये जडविण्यासाठी मधोमध मोठा ‘डीबियर्स’, अशी सर्व रत्ने वापरून नेकलेस बनविण्यासाठी, ही सर्व रत्ने पटियालाहून बोटीने पॅरिस येथे पाठविण्यात आली. ‘कार्टीयर’च्या कुशल कारागीरांच्या दोन वर्षांच्या मेहनतीनंतर १९२८ साली पटियाला नेकलेस अखेर तयार झाला.
neckless3
प्लॅटीनमचा बेस असणाऱ्या या नेकलेसमध्ये २९३० हिरे होते. सर्व मिळून हे हिरे ९२५.२५ कॅरट वजनाचे असून, या नेकलेसच्या मध्यभागी पिवळसर झाक असणारा डी बियर्स हिरा २३४ कॅरटचा असे. हा डी बियर्स हिरा आकाराने कोहिनूर हिऱ्यापेक्षामोठा होता. तसेच या नेकलेसमध्ये आणखी एक तेजस्वी, तांबूस रंगाचा हिराही होता. महाराज भूपिंदर सिंह यांच्या नंतर हा हार त्यांचे वारस महाराज यादवेंदर सिंह यांच्याकडे आला. त्यानंतर १९६० साली हा बहुमूल्य हार पटियालामधून अचानक नाहीसा झाला. त्याचे काय झाले याची कल्पना कोणालाही नव्हती. त्यानंतर १९९८ साली हा हार लंडनमधील एका ‘अँटिक्स’च्या स्टोअरमध्ये पुन्हा दृष्टीस पडला. पण जेव्हा हा पुन्हा सापडला तेव्हा याचे रंगरूप पार बदलून गेले होते, कारण या हाराची केवळ ‘फ्रेम’ शिल्लक होती आणि यामध्ये जडविलेली सर्व रत्न काढून घेऊन त्यांची विक्री करण्यात आली होती.

ही फ्रेम कार्टीयर कडून खरेदी करण्यात येऊन त्यामध्ये ‘झिर्कॉन’ नामक खडे जवडून या हाराची प्रतिकृती तयार करण्यात आली. त्यानंतर कार्टीयरच्याच स्टोअरमध्ये ही हाराची प्रतिकृती प्रदर्शित करण्यात आली. मात्र पटियाला नेकलेस मध्ये जडविलेले हिरे कुठे गेले याचा मागमूस लागू शकला नाही. आज खरा पटियाला नेकलेस अस्तित्वात असता तर त्याची किंमत तब्बल तीस मिलियन डॉलर्सच्या आसपास ठरली असती.

Leave a Comment