राजस्थानच्या बगड गावाची सून होणार इशा अंबानी

piramal
उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या इशा पिरामल ग्रुपचे मालक आनंद याच्याबरोबर विवाहबद्ध होणार असून दोन्ही कुटुंबात विवाहाच्या तयारीला सुरवात झाली आहे. तत्पूर्वी येत्या २१ सप्टेंबरला इटली येथे या दोघांचा साखरपुडा होत असून प्री वेडिंग सेरेमनी राजस्थानातील सरोवरांचे शहर असलेल्या उदयपुर येथे साजरा केला जाणार आहे. पिरामल हे मुळचे राजस्थानचे असून झुंजनु जवळ असलेल्या बगड या छोट्या गावाचे रहिवासी आहेत. हे गाव छोटे असले तरी येथील हवेल्या जगभरात प्रसिद्ध आहेत. पिरामल याच्या या वडिलोपार्जित गावात त्याचीही मोठी हवेली आहे.

इशा आणि आनंद याचा विवाह डिसेंबर मध्ये मुंबईत होणार असला तरी इशा बगड गावाची सून म्हणून ओळखली जाणार आहे. १९२० साली पिरामल उद्योगाचे संस्थापक आणि आनंद पिरामल याचे आजोबा सेठ पिरामल चतुर्भुज मखारीया केवळ ५० रु. घेउन या गावातून मुंबईत व्यवसाय सुरु करण्यासाठी आले होते आणि त्यातून आज हा ६७००० कोटींचा व्यवसाय झाला आहे. बगड गावात या कुटुंबाची भव्य हवेली असून तेथे सध्या हॉटेल चालविले जाते. या गावात अनेक भव्य हवेल्या असून अतिशय सुंदर सज्जे, झरोखे, व्हरांडे, कोरीव कामाचे दरवाजे आणि अतिशय सुंदर चित्रांनी ते सजलेले आहेत.

Leave a Comment