कुठल्याही परिस्थितीत डॉल्बी वाजवणारच : उदयनराजे भोसले आपल्या भूमिकेवर ठाम

udyanraje-bhosale
सातारा: साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले न्यायालयाच्या आदेशानंतरही आपल्या भूमिकेवर ठाम असून कुठल्याही परिस्थितीत डॉल्बी वाजवणारच आणि मंगळवार तळ्यातच सातारा शहरातील गणपतींचे विसर्जन होणार, अशी भूमिका उदयनराजेंनी घेतली आहे.

न्यायालयाचा अवमान झाला तरी त्यासाठी मी समर्थ आहे, मी पळपुटा नाही, कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहणार असेही उदयनराजे म्हणाले. दुसरीकडे पोलिसही डॉल्बी वाजवू न देण्याच्या भूमिकेवर ठाम असून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन पोलिसांची भूमिका स्पष्ट केली होती. नांगरे पाटील यांनी गणेशोत्सव शांततेत साजरा केला जाईल असा विश्वास व्यक्त केला होता. उच्च न्यायालयाच्या नियमांच्या अधीन राहून हा उत्सव साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले होते.

मुंबई उच्च न्यायालयाने गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीतील डीजे आणि डॉल्बीच्या वापरास परवानगी देण्यास तूर्तास नकार दिला आहे. पण उच्च न्यायालयाने राज्य सरकारला साऊंड सिस्टिमच्या वापरावर सरसकट बंदी घालणे कितपत योग्य आहे? असा सवाल विचारला आहे. आम्ही सण-उत्सवातील गोंगाटाकडे डोळे बंद करून पाठ फिरवू शकत नाही असे न्यायालयाने म्हटले आहे.