पहिल्यांदाच बोहरा समाजाच्या कार्यक्रमात पोहचले पंतप्रधान

narendra-modi
इंदुर – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोहरा समाजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना बोहरा समाजाशी माझे जुने नाते आहे. मी एक प्रकारे या समाजाचा भागच झालो आहे. तुमच्या कुटुंबासाठी माझे दार आजही खुले असल्याचे म्हटले आहे. मोदी आज मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. मोदी यावेळी आशरा मुबारका या इमाम हुसैन यांच्या स्मृती दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले.

मोदींनी मध्यप्रदेश दौऱ्यावर दाऊदी बोहरा समाजाच्या सैफी मशिदीलाही भेट दिली. बोहरा समाजाचे धर्मगुरू सईदाना मुफद्दल सैफुद्दीन यांनी यावेळी मोदींना त्यांच्या वाढदिवसाच्या आगाऊ शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या उदंड आयुष्याची कामनादेखील केली. पंतप्रधान मोदींची ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेली आहे. मोदी यापूर्वी कधीही बोहरा समाजाच्या मशिदीमध्ये गेले नव्हते. २०११ च्या सद्भावना कार्यक्रमात गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी मुस्लिमांची टोपी घालायचे टाळले होते. आता मध्यप्रदेशात विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. यावरुन मोदी मतांचे राजकारण करत आहेत का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमात आयुष्यमान योजनेबद्दलही सांगितले. आपल्या देशावर प्रेम करणारा, दुसऱ्यांची मदत करणारा जर कोणता समाज असेल. तर तो, बोहरा हा समाज आहे, असे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण म्हणाले.