जपानमध्ये आहे असा ही ‘विंड फोन’

phone
२०१० साली जपानमधील ओतसूची गावामध्ये राहणाऱ्या इतारू सासाकीच्या भावाच्या निधनाने इतारू खूपच कष्टी झाला. काही केल्या भावाच्या निधनाचे दु:ख कमी होईना. शेवटी आपल्या मनावरील दु:खाचे ओझे कमी करण्यासाठी त्याने एक अभिनव कल्पना शोधून काढली. त्याने एका काचेच्या फोन बूथ मध्ये एक टेलिफोन ठेवला. या फोन वर तो आपल्या मृत भावाशी संभाषण केल्याप्रमाणे बोलू लागला. पाहता पाहता इतारूच्या मनावरील दु:खाचा भार हलका झाला. त्यानंतर पुढे वर्षभराच्या काळामध्ये जपान देशाला एका पाठोपाठ आलेल्या आपदांनी हेलकावून सोडले. आधी आलेला प्रचंड तीव्रतेचा भूकंप, त्यानंतर उसळलेल्या सुनामीच्या विशालकाय लाटा, आणि या आपदांच्या मुळे झालेले ‘न्यूक्लियर मेल्ट डाऊन’ या सर्व आपदांच्या मुळे सासाकी रहात असणाऱ्या ओतसूची गावाला तीस फुटी लाटांनी गिळंकृत केले. गावातील दहा टक्के जनता या आपदांच्यामुळे प्राणांना मुकली.
phone1
मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याने, लोकांना आपले आप्तेष्ट, मित्रमंडळींना गमावल्याचे दु:ख अर्थातच मोठे होते. या दु:खातून बाहेर पडण्यासाठी त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने इतारूने आपला ‘विंड फोन’ सर्वांसाठी उपलब्ध करविला. या विंड फोनवरुन हे लोक आपापल्या नातेवाईकांशी, प्रियजनांशी मनमोकळेपणाने संभाषण करून मनावरील दु:ख कमी करून घेऊ लागले. सासाकीच्या या ‘विंड फोन’ ची चर्चा आसपासच्या इतर गावांमध्ये ही पसरली आणि त्या गावांमधील लोकही विंड फोन वर आपल्या प्रियजनांशी ‘संपर्क’ साधण्यासाठी येऊ लागले. खरे तर हा विंड फोन कुठेही जोडलेला नाही, यावरील संभाषणही एकतर्फीच, पण केवळ आपण आपण जे बोलतो ते आपल्या प्रियजनांच्या पर्यंत पोहोचत आहे अशी कल्पनाच या लोकांचे दु:ख कमी करणारी ठरली.
phone2
आतापर्यंत सासाकीच्या ओतसूची गावातील या विंड फोन वर आपल्या प्रियजनांशी संपर्क साधण्यासाठी आजवर हजारोंच्या संख्येने लोक येथे आले आहेत. जपानमध्ये नैसर्गिक आपदा येऊन आता काही वर्षे लोटली आहेत, पण तरीही हा विंड फोन आजही वापरला जात आहे. आपल्याला सोडून गेलेल्या प्रियजनांच्या आठवणी मनामध्ये जपून येथील रहिवासी आपल्या शहराबरोबरच आपले जीवन ही पुन्हा नव्याने उभारत आहेत.

Leave a Comment