कासारगोड, केरळ मधील मधुर महागणपती

madhur1
नितान्सुंदर केरळ राज्यातील कासारगोड पासून ८ किमी वर असलेले १० व्या शतकातील मधुर महागणपती मंदिर वास्तू सौंदर्याचा सुंदर नमुना म्हणून तरी पाहायला हवे. वास्तविक हे मुळचे शिवमंदिर. पण ते प्रसिद्ध आहे ते गणेश मंदिर म्हणून. मधुवाहिनी नदीच्या काठी असलेल्या या मंदिरातील गणेश प्रतिमा माती अथवा दगडाची नाही तर ती काही वेगळ्याच प्रकारची आहे. असे सांगतात कि फार पूर्वी या मंदिरातील पुजाऱ्याच्या लहान मुलांने भिंतीवर गणेश प्रतिमा काढली आणि हळूहळू या प्रतिमेचा आकार वाढत जाऊन ती मोठी मूर्ती बनली. या गणेशाला सिद्धिविनायक असेही म्हणतात.

madhur2
हे मंदिर अतिशय कलात्मक पद्धतीने बांधले गेले आहे. मंदिराभोवती तळे असून त्याचे पाणी औषधी आहे असे मानतात. या पाण्याने अनेक रोग बरे होतात असा विश्वास आहे. मंदिराचा कळस तीन मजली असून त्याला तांब्याचा मुलामा दिला गेला आहे. मंदिराच्या भिंतीवर लाकडात महाभारत, रामायण यातील प्रसंग कोरले असून हे कोरीव काम पाहण्यासारखे आहे. या मंदिराचे व्यवस्थापन केरळ सरकारकडे आहे. येथे मुदाप्पा सेवा हा खास उत्सव साजरा केला जोतो. यात गणेश मूर्तीला गोड भात आणि तूप यांच्या सहाय्याने लेप केला जातो.

असे सांगतात कि टिपू सुलतान या मंदिराला नष्ट करण्यासाठी आला होता मात्र येथे येताच त्याचे मन पालटले आणि तो तसाच परत गेला. मंदिराभोवती नारळाची झाडे आणि भात शेती असून त्यामुळे हा सारा परिसर हिरवाईने नटलेला आहे.

Leave a Comment