आता विश्वास नांगरे पाटील टीमलाच खासदार उदयनराजेंचे खुले आवाहन

udayanraje
सातारा – आता पोलिसांना खासदार उदयनराजेंनी खुले आवाहन दिल आहे. डिजे गणपती उत्सवादरम्यान लावणार असल्याचे म्हणत, त्यांनी कायद्यालाच थेट आवाहन दिले आहे. त्यांनी साताऱ्यातील कार्यकर्त्य़ांना एका गणपती आगमन समारंभात कायद्याची चौकट न बाळगता डीजे लावण्याचा संदेशच दिला आहे. जब तक है जान तब तक डॉल्बी रहेगी, म्हणत आपण गणपतीचे खरे भक्त असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे. आता पोलिस या खुल्य़ा आवाहनावर नेमकी काय भुमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी डीजे लावणारच असं सांगून पुन्हा कायद्याला आव्हान दिले आहे. ते सातारा शहरातील एका गणपती आगमनावेळी स्टेजवर बोलत होते. त्यांनी यावेळी बोलताना कायद्याची चौकट न पाळण्याचा कार्यकर्त्यांना जणू संदेशच दिला. दरम्यान सर्वांनी न्यायालय आणि पोलिसांच्या आदेशाचे पालन करुन कायदयाचा आदर करावा कुठेही डॉल्बी लावू देणार नाही अशी तंबी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे.

विसर्जन २३ तारखेला आहे तेव्हा पाहू काय होते आणि काय नाही होते आणि कसे नाही होत. डॉल्बी लागलाच पाहिजे, डेसीबल ठरवणारे न्यायालय आणि पोलिस डिपार्टमेंट कोण? तुमच्या आमच्यासारखे अवली लोक डेसीबल ठरवतात. आम्ही खऱ्या अर्थाने गणपतीचे भक्त आहोत. गणपतीला त्रास होत नाही तर इतरांना त्रास व्हायचे काही कारणच नाही. त्रास तरीही झालाच तर एक दोन दिवस सहन करायला काही जात नाही. मोठ्या आवाजाने बिल्डींग पडतात.. हे पडते… ते पडते… या साऱ्या गोष्टी खोट्या आहेत. उलट जुन्या इमारती पाडण्यासाठी याचा वापर करा. जुन्या इमारतींची डागडुजी करत नाहीत. मात्र तुम्ही बिचाऱ्या सुसंस्कृत पोरांचे हट्ट ऐकत नाहीत. मग काय करायचे हे पाहिले जाईल.

मी ही धमकी नाही तर समज देत आहे. प्लॅन करा नाहीतर तुम्ही कोणत्याही न्यायालयात जावा डॉल्बी तर असणारच आहे. जब तक है जान तब तक डॉल्बी रहेगी… जब तक डॉल्बी रहेगी तब तक गणपती रहेगा. एवढच सांगतो आता बोलायची वेळ नाही.