नवऱ्यामुलीच्या सतत व्हॉटस् अॅपवर अॅक्टिव्ह राहण्याच्या सवयीमुळे मोडले लग्न

whatsapp
लखनऊ – व्हॉटस् अॅपच्या अतिवापरामुळे सर्वच वयोगटातील लोक आत्ता नको तेवढे ‘बिझी’ झाल्याचा शेरा मारला जात होता. अनेक व्यंगचित्रे, विनोद यांचीही यावर सोशल मीडियावर रेलचेल आहे. पण या ‘व्हॉटस् अॅप वेडा’मुळे आता नवीनच प्रकार पहायला मिळत आहे. नवऱ्यामुलीच्या सतत व्हॉटस् अॅपवर अॅक्टिव्ह राहण्याच्या सवयीमुळे चक्क लग्नच मोडल्याची घटना उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील नौगाव सादत या गावात घडली.

व्हॉटस् अॅपवर नवरी व तिचे नातेवाईक मश्गूल असल्यामुळे बराच काळ होणाऱ्या सासरच्या मंडळींना ताटकळत रहावे लागले होते. नवरा मुलगा व सासरच्या मंडळींनी या प्रकारामुळे फोनवरून लग्न रद्द झाल्याची माहिती दिली. या आरोपाचा नवरीच्या वडील उरोझ मेहंदी यांनी साफ इन्कार करत हुंडा प्रकरणामुळे हे लग्न रद्द झाल्याचे म्हटले आहे. याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. नवऱ्याकडीलच्या मंडळींनी लग्नाच्या ऐन वेळी ६५ लाखांचा हुंडा मागितला होता. त्यांनी ही गोष्ट लपविण्यासाठी मुलीला व्हॉटस् अॅपचे वेड असल्याची खोटी बतावणी केल्याचे मेहंदी यांनी म्हटले आहे.

पुढे मेहंदी म्हणाले की, त्यांच्या मुलीचे फकीरपुरा येथील कमर हैदर यांच्या मुलाशी लग्न ठरले होते. त्यांच्या स्वागतासाठी आमचे सर्व नातेवाईक जमले होते. पण त्यांच्यापैकी कोणीच आले नाही. त्यांना फोन केला असता, त्यांनी लग्न रद्द झाल्याचे सांगितले. ५ सप्टेंबरला हे लग्न होणार होते. मात्र मुलाकडच्या लोकांनी नवऱ्या मुलीचे सतत व्हॉटस् अॅपवर असणे हेच लग्न मोडण्याचे कारण असल्याचे सांगितले. तसेच, मुलगी होणाऱ्या नवऱ्याला लग्नापूर्वीच व्हॉटस् अॅपवरून मेसेज करत असल्याचेही म्हटले आहे. यावरून मुलीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळेही हे लग्न मोडले असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Leave a Comment