टेक्सासमध्ये आकाराने वाढतच जाणाऱ्या ‘विंक सिंक्स’मुळे मोठे संकट

sink
पश्चिमी टेक्सासच्या वाळवंटा मध्ये असणारी दोन प्रचंड विवरे तेथील स्थानिक प्रशासनासाठी मोठ्या चिंतेचे कारण बनली आहेत. या विवरांचा आकार दिवसेंदिवस वाढतच जात आहे. ही विवरे एकमेकांपासून काहीच अंतरावर असून, आकार वाढत जाऊन ही विवरे एकत्र आल्यास एक प्रचंड मोठे विवर तयार होण्याचे नवे संकट आता उभे राहिले आहे. टेक्सासच्या विन्क्लर काऊंटीमध्ये ही विवरे असून, १९२६ ते १९६४ या काळामध्ये तेल आणि नैसर्गिक वायूसाठी या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर केल्या गेलेल्या उत्खननाच्या परिणामस्वरूप ही प्रचंड आकाराची विवरे इथे तयार झाली आहेत. खोदल्या गेलेल्या या विवरांमध्ये पाणी साठून त्यामुळे विवरांच्या आतील खडक आणि माती कमकुवत होऊन खचू लागल्याने या विवरांचा आकार वाढत चालला आहे. या विवरांना ‘विंक सिंक्स’ म्हटले जाते.
sink1
पहिले विंक सिंक १९८० सालच्या जून महिन्यामध्ये बनले. जेव्हा जमीन खचून हे मोठे विवर तयार झाले तेव्हा ते ११२ फुट खोल होते आणि त्याचा परीघ ३६० फुटांचा होता. दुसरे विंक सिंक २००२ सालच्या मे महिन्यामध्ये बनले असून, सुरुवातीला याचा परीघ ४५० फुटांचा होता. पण आता काहीच वर्षांमध्ये याचा परीघ ४५० फुटांवरून सहाशे फुटांच्या पेक्षा जास्त बनला आहे. गेल्या दहा वर्षांच्या काळात उपग्रहांच्या द्वारे केल्या गेलेल्या छायाचित्रणातून ही विवरे आकाराने वाढतच असल्याचे निष्पन्न झाले आहे. जर आकार वाढत जाऊन ही विवरे एकत्र आली तर एक मोठी आपदा येण्याचा धोका तर आहेच, आपण त्याचसोबत आसपासची जमीन खचून आणखीही मोठी विवरे तयार होण्याचे संकट देखील उभे ठाकले आहे.
sink2
असे असतानाही, या परिसराच्या आसपास असणाऱ्या विंक आणि कर्मिट शहरांतील नागरिक मात्र सध्या तरी फारसे चिंतेमध्ये दिसत नाहीत, कारण ही विंक सिंक्स जरी एकत्र येऊन जमीन खचली, तरी त्याचा थेट परिणाम या शहरांवर होणार नाही असे सध्याचे चित्र आहे. या संपूर्ण परिसरामध्ये तेलाच्या खाणी असून सर्वत्र पाईपलाईन्स आणि मशिनरीचे जाळे पसरले आहे. भूगर्भशास्त्रज्ञ देखील सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.

Leave a Comment