खराब नोटा बदलून देण्याच्या नियमात आरबीआयने केला महत्वपूर्ण बदल

RBI
मुंबई – आपल्याकडे असलेल्या २ हजार रुपये व नव्या २०० रुपयांच्या खराब व फाटलेल्या स्थितीत असलेल्या नोटा आता भारतीय रिझर्व्ह बँक परत घेणार असून आरबीआयने त्यासाठी आपल्या पूर्वीच्या नियमात बदल केला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने नोटाबंदी लागू झाल्यानंतर प्रथमच खराब झालेल्या नोटा बदलून घेण्यासाठी पूर्वीच्या नियमात बदल केला आहे. नागरिकांना आरबीआयकडून त्या नोटांच्या स्थितीवर अर्धे अथवा पूर्ण मुल्य मिळू शकणार आहे. १००० व ५०० रुपये या मुल्यांच्या नोटा नोव्हेंबर २०१६ मध्ये चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. २०० रुपये, २००० रुपये, १० रुपये, २० रुपये, ५० रुपये १०० रुपये आणि ५०० रुपये अशा मुल्यांच्या नव्या नोटा त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनात आणल्या होत्या. या नोटा आता फाटल्या अथवा खराब झाल्यास त्या नोटा नागरिकांना आरबीआयची कार्यालये, आरबीआयने मान्यता दिलेल्या बँकांच्या शाखांमधून बदलून घेता येणार आहेत.

नोट रिफंड नियम २००९ मध्ये आरबीयने बदल केला आहे. कारण महात्मा गांधी (नवीन) नोटांची श्रेणी ही पहिल्या नोटांच्या तुलनेत आकाराने लहान असल्यामुळे नोट रिफंड नियमात आरबीआयला बदल करावा लागला. आरबीआय नोटांच्या तुकड्यांचा आकार किती यावरून त्याचे मुल्य नागरिकाला परत देते.

Leave a Comment