गुगलचे अॅनिमेटेड डुडलच्या माध्यमातून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

google
पुणे – भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्मदिन असून देशभरात आजचा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. याचे औचित्य साधत गुगलनेही अॅनिमेटेड डुडलच्या माध्यमातून भारतीयांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

फिरणारी पृथ्वी या डुडलमध्ये दाखवण्यात आली असून आजूबाजूला शैक्षणिक विषयासंबंधित फोटो दाखवण्यात आले आहेत. शास्त्रीय उपकरणे, संगीत, खेळ, अवकाश, वही, तंत्रज्ञान, प्राणी यांच्या प्रतिकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. ५ सप्टेंबरला भारतात शिक्षक दिन साजरा केला जातो. तर, जगभरात ५ ऑक्टोबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी भारतात शिक्षक दिन साजरा केला जातो. राधाकृष्णन हे एक उत्तम शिक्षक होते. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळे त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

भारतात १९६२ पासून शिक्षक दिन साजरा केला जातो. शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी यादिवशी आपल्या शिक्षकांप्रति त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. एक शिक्षक हा आपला मित्र, हितचिंतक आणि मार्गदर्शक असतो. बालपणापासून आपल्यावर शिक्षकांचा मोठा प्रभाव असतो. शालेय जीवनापासून ते महाविद्यालय आणि पुढील आयुष्यातही आपल्या शिक्षकांनी दिलेल्या शिदोरीचा आपल्याला पदोपदी उपयोग होत असतो.

Leave a Comment