लाजिरवाण्या पराभवानंतरही विराटचे कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान कायम

virat-kohli
दुबई – टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत लाजीरवाणा पराभव झाला असला तरीही विराट कोहलीच्या आयसीसी क्रमवारीत या पराभवाचा कोणताही परीणाम झाला नाही. इंग्लंड समोर पूर्ण भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले असताना पूर्ण मालिकेत विराटने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. विराटने याच जोरावर आयसीसी कसोटी क्रमवारीत ९३७ गुणांसह आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कोहलीने दमदार धावा केल्यानंतर त्याने अव्वल स्थान पटकावले होते. त्यानंतर लॉर्ड्स येथील दुसऱ्या कसोटीत त्याला कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश असल्यामुळे अव्वल स्थान त्याला गमवावे लागले. कोहलीने तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात ९७ आणि दुसऱ्या डावात १०३ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. चौथ्या कसोटीतही पहिल्या डावात ४६ तर दुसऱ्या डावात ५८ धावांची खेळी केली होती. विराटच्या या सातत्यपूर्ण खेळामुळे त्याने आपले अव्वल स्थान टिकवून ठेवले आहे.

ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ ९२९ गुणांसह आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. पण ऑस्ट्रेलियन क्रिकेटने स्मिथवर एका वर्षाची बंदी घातल्यामुळे वर्षभर तो आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळू शकणार नाही. तिसऱ्या स्थानावर ८४७ गुणांसह न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन आहे.