चलनी नोटांमधून रोगांचा प्रसारॽ व्यापाऱ्यांच्या संघटनेची चौकशीची मागणी

notes
देशातील चलनी नोटांमधून रोगांचा प्रसार होत आहे, अशी शंका व्यक्त करून या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांच्या संघटनेने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे केली आहे.

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) या संघटनेने ही मागणी करणारे पत्र रविवारी जेटली यांना लिहिले. तसेच लोकांनी या संबंधात सावधगिरी बाळगावी, असे आवाहनही लोकांना केले आहे. या प्रकाराची त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी कॅटने केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे.

संघटनेने या संदर्भात विविध पाहण्यांचा संदर्भ दिला असून नोटांमध्ये विषाणू आढळले असल्याचा दावा केला आहे, असे जनसत्ता वृत्तपत्राने म्हटले आहे. या विषाणूंमुळे पोट दुखणे, क्षयरोग आणि अल्सर यांसारखे आजार होऊ शकतात, असे कॅटचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले.

अशा प्रकारचे अहवाल दरवर्षी शास्त्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित होतात मात्र याकडे कोणीही लक्ष देत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे, असे खंडेलवाल म्हणाले.

चलनी नोटांमुळे सुमारे 78 प्रकारचे आजार पसरतात, असे काउंसिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या केंद्र सरकारच्या संस्थेचा भाग असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ जीनोमिक्स अँड इंटीग्रेटिव्ह बायोलॉजी या संस्थेने केलेल्या पाहणीत आढळले होते.

Leave a Comment