नोटबंदी आणि जीएसटी भोवली, लघुउद्योजक थकबाकीदार दुपटीने वाढले

GST
देशातील सूक्ष्म आणि लघु उद्योगांना नोटबंदी आणि जीएसटीचा मोठा फटका बसला असून एका वर्षात या क्षेत्रातील थकबाकीदारांची संख्या दुपटीने वाढली आहे, असे रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या माहितीवरून उघड झाले आहे. दि इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राने माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागविलेल्या माहितीतून ही आकडेवारी समोर आली आहे.

या आकडेवारीनुसार, सूक्ष्म आणि लघु उद्योगांची थकबाकी मार्च 2017 पर्यंत 8249 कोट रुपये एवढी होती. ती मार्च 2018 पर्यंत वाढून 16118 कोटी रुपये म्हणजे जवळपास दुप्पट झाली आहे. सूक्ष्म आणि लघु उद्योगांची अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) 82382 कोटी रुपयांवरून वाढून मार्च 2018 पर्यंत 98500 कोटी रुपये झाल्याचेही या माहितीवरून समोर आले आहे. हे कर्ज सूक्ष्म उद्योगांना प्रकल्प व यंत्रसामग्रीसाटी देण्यात येतो. तो 25 लाखांपासून 5 कोटी रुपयांपर्यंत असू शकतो. विशेष म्हणजे सूक्ष्म आणि लघु उद्योगांच्या या थकबाकीमध्ये 65.32 टक्के एवढा वाटा सरकारी बँकांचा आहे.

छोट्या आणि मध्यम उद्योगांच्या संदर्भात स्वतः रिझर्व्ह बँकेने एक पाहणी केली होती. त्यात नोटबंदीपाठोपाठ जीएसटीनेही या उद्योगांना फटका बसल्याचे दिसून आले होते. नोटबंदीनंतर वस्त्रोद्योग आणि दागिन्यांच्या उद्योगातील कंत्राटी कामगारांना पैसे मिळण्यात अनेक अडचणी आल्या, असे आरबीआयच्या आर्थिक धोरण विभागाचे तज्ज्ञ हरेंद्र बेहरा आणि गरीमा वाही यांनी सांगितले.

Leave a Comment