तलाव मानवी सांगाड्यांच्या अवशेषांचा – रूपकुंड

roopkund
१९४२ साली वन संरक्षण खात्याच्या एका ब्रिटीश अधिकाऱ्याला रूपकुंड येथे असे काही दृश्य आढळले, जे पाहून तो चक्रावला. समुद्र पातळीपासून १६००० फुटांच्या उंचीवर, एका डोंगराच्या पायथ्याशी बर्फाने आच्छादलेला रूपकुंड तलाव, मानवी सांगाड्यांच्या अवशेषांनी भरलेला होता. त्या वर्षी उन्हाळा जास्त असल्याने तलावातील बर्फ झपाट्याने वितळू लागले होते. जसजसे बर्फ वितळत गेले, तसतसे अधिकाधिक सांगाडे दृष्टीस पडू लागले. हे सांगाडे केवळ तलावाच्या पाण्यामध्येच नाही, तर तलावाच्या किनाऱ्यावरही आढळले. हे सांगाडे पाहून या ठिकाणी कधी काळी काही तरी भयानक घडून गेले असावे, असेच भासत होते.
roopkund1
ते दिवस युद्धाचे असल्यामुळे जपानी सैनिक भारतामध्ये घुसण्याच्या प्रयत्नात असताना, भयंकर थंडीमुळे त्यांना मृत्यू आला असावा असे अनुमान पहिल्या प्रथम लावले गेले. त्यामुळे जपानी सैन्य या मार्गाने आक्रमण करण्यास तर येत नाही अशी शंका येऊन ब्रिटीश सरकारने अधिक तपास करण्यासाठी एक दल तेथे रवाना केले. सांगाड्यांची आणि इतर परिसराची पाहणी केल्यानंतर जपानी सैन्याकडून आक्रमणाचा धोका नसल्याचे आणि सापडलेले मानवी सांगाडे जपानी सैनिकांचे नसल्याचे निष्पन्न झाले. याचे मुख्य कारण म्हणजे सापडलेले सांगाडे आणि इतर अवशेष पुष्कळ वर्षांपासून तेथे असावेत असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला.
roopkund2
तेथील थंड, कोरड्या हवामानामुळे केस, मांस आणि हाडे चांगल्या परिस्थितीमध्ये असली, तरीही हे अवशेष पुरातन असावेत असा प्राथमिक अंदाज तज्ञांनी वक्त केला. मात्र दोनशेच्या वर सांगाडे येथे असल्याने इतक्या सगळ्या लोकांना अचानक मृत्यू कशामुळे आला असावा याचा अंदाज लावणे कठीण होऊन बसले. एखादा संसर्गजन्य, जीवघेणा आजार, किंवा अचानक झालेले भूस्खलन, किंवा एखादी भयंकर नैसगिक आपदा, एखाद्या विधीसाठी अनेक लोकांनी एकत्र येऊन दिलेला स्वतःचा बळी, असे अनेक कयास, इतक्या लोकांच्या अचानक मृत्यूसाठी लावले जाऊ लागले.
त्यानंतर जसजसे तंत्रज्ञान प्रगत होत गेले, तसतसे या अवशेषांचे विशेल्षण केले जाऊन हे सांगाडे ८५० सालातील असावेत असे प्राथमिक अनुमान शास्त्रज्ञांनी लावले. तसेच या सांगाड्यांच्या कवट्यांवर कोणत्यातरी गोलाकार वस्तूने आघात केल्याप्रमाणे घावही दिसून आले होते. हे घाव केवळ डोक्यांवर आणि खांद्यांच्या वर आढळल्याने डोक्याच्या वरून कोणी तरी आघात केले असावेत असे अनुमान तज्ञांनी व्यक्त केले. पण जर हे हत्याकांड असले, तर ते कोणी घडवून आणले, आणि त्या हत्याकांडाला बळी पडलेले हे लोक कोण होते, या रहस्यावरून पडदा उठलेला नाही.
roopkund3
हिमाचल प्रदेशामध्ये गायिले जाणारे एक प्रसिद्ध लोकगीत या रहस्यावर प्रकाश टाकणारे ठरू शकेल असे म्हटले जाते. या ठिकाणी परदेशातून आलेल्या लोकांच्या अतिक्रमणामुळे येथील देवता इतके कोपाविष्ट झाले, की या देवतांनी लोखंडाप्रमाणे कणखर गारांचा वर्षाव या आगन्तुकांवर केला, अश्या घटनेचे वर्णन करणारे हे लोकगीत आहे. आश्चर्याची गोष्ट अशी, की २००४ साली केल्या गेलेल्या रिसर्चमध्ये शास्त्रज्ञांनी देखील या लोकांचा मृत्यू भयंकर गारांच्या वादळामुळे झाला असल्याचे निदान केले आहे. त्यानंतर सुमारे बाराशे वर्षे हे अवशेष या तलावामध्ये आणि त्याच्या आसपास पडून होते.

Leave a Comment