जीमेल देणार इमेलला स्वतःच उत्तर!

gmail
तुम्हाला आलेल्या इमेलला उत्तर देण्यासाठी काही मिनिटे घालविण्याचीही आता तुम्हाला गरज राहणार नाही. कारण इमेलला स्वतःच उत्तर देण्याची सुविधा गुगल पुरविणार असून त्याची चाचणी सुरू झाली आहे.

इंटरनेटवरील जीमेलच्या ताज्या आवृत्तीत ही स्वयं-प्रतिसादाची सुविधा देण्यात आली आहे. अँड्रॉईड आणि आयफोनवर आधीपासून असलेल्या एका सुविधेचाच हा विस्तार आहे. मोबाइल उपकरणांवर ही सुविधा बंद करण्याचा पर्याय सेटिंग्जमध्ये उपलब्ध आहे, मात्र वेबवर हा पर्याय उपलब्ध नाही. आतापर्यंत या नवीन सुविधेला वापरकर्त्यांकडून मिश्र प्रतिसाद मिळत आहे.

स्मार्ट रिप्लाय असे या नवीन सुविधेला नाव देण्यात आले आहे. यात “आपल्याला भेटून खूप आनंद झाला,” किंवा “मी त्यात लक्ष घालेन” अशा प्रकारचे तीन उत्तर आहेत. मात्र नेहमीच्या ऑटो-रिप्लायऐवजी यात आलेल्या मेलनुसार बदल करण्याची सोय आहे. ज्या व्यक्तीने मेल पाठविला त्याच्या मजकुरानुसार हे उत्तर देण्याची सोय त्यात आहे.

गुगलच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीवर ही सुविधा आधारित आहे. मात्र यात प्रत्येक ई-मेलला उत्तर सुचविण्यात येणार नाहीत, तर केवळ संक्षिप्त उत्तरांची गरज असलेल्या मेलनाच अशी उत्तरे मिळतील.

Leave a Comment