ही आहे रहस्यमयी कुलुपांची दुनिया

lock
भारतामध्ये रहस्यमयी कुलुपांचे एक वेगळेच जग एकेक काळी अस्तित्वात होते. ही कुलुपे विना किल्लीच्या उघडणे निव्वळ अशक्य होतेच, पण किल्ली असूनही ही कुलूपे उघडणे हे मोठे जिकीरीचे काम होते. हे काम सर्वांनाच जमेल असेही नसे. मुंबई मध्ये असलेल्या ‘आई’ नामक वस्तू संग्रहालयामध्ये अनेक शतकांपूर्वी वापरात असलेल्या वस्तूंचा संग्रह आहे. या वस्तू राजा-महाराजंच्या किल्ल्यांवरल्या, राजमहाल, घरे, कार्यालये या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या आहेत. याच वस्तूंमध्ये अनेक रहस्यमयी कुलुपांचाही समावेश आहे.
lock1
ही कुलुपे उघडण्याकरिता पाच निरनिराळ्या ‘कुंजी’ किंवा किल्ल्या आणि पद्धती वापरल्या जात असत. या पद्धतीदेखील एखाद्या रहस्याहून कमी नव्हत्या, कारण या पद्धती चटकन उलगडत नसत. अश्या प्रकारची कुलुपे जास्त करून दक्षिण भारतातील प्राचीन राज्यांमध्ये आढळत असत. तेथील राजे महाराजे या कुलुपांचा वापर करीत असत. अतिशय मोलाचे जिन्नस, महत्वाची, संवेदनशील कागदपत्रे, हत्यारे, शस्त्रसाठा, इतर राज्यांशी झालेल्या तहाची कागदपत्रे इत्यादी वस्तू या कुलूपांमध्ये बंद करून ठेवल्या जात असत. जरी शत्रूने राजमहालावर कब्जा केला, तरी ही सर्व महत्वाची कागदपत्रे आणि इतर महत्वपूर्ण वस्तू दुश्मनांच्या हाती सहज लागू नयेत या उद्देशाने ही विशिष्ट कुलुपे तयार करण्यात येत असत. ही कुलुपे केवळ लोखंडापासूनच नाही, तर निरनिराळे धातू वापरून बनविली जात असत.
lock2
कोणत्या वस्तू कुलुपात बंद करायच्या आहेत, आणि त्यांचे मूल्य किती आहे हे पाहून कुलूप कश्या प्रकारचे असायला हवे हे ठरविले जात असे. ही कुलुपे केवळ निरनिराळ्या धातूंची नाही, तर निरनिराळ्या आकारांची देखील असत. हे आकार इतके चित्रविचित्र असत, की आपल्यासमोर जी वस्तू आहे, ती म्हणजे एक कुलूप आहे, हेच अनेकदा पाहणाऱ्याच्या लक्षात येत नसे. ही कुलुपे निरनिरळ्या जीव जंतूंच्या, फुला-पानाच्या, तर कधी विंचू, मासे, अश्या आकारांमध्ये असत. ही कुलुपे इतकी भक्कम असत, की कालांतराने केवळ शाही कोषासाठीच नाही, तर सामान्य नागरिक देखील आपली मूल्यवान संपत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी या कुलुपांचा वापर करू लागली होती.

Leave a Comment