उत्तर प्रदेशच्या मंदिरातील हनुमानाच्या मूर्तीला सुटत आहे ‘घाम’

hanuman
एटा – उत्तर प्रदेशामधील एटा मुख्यालयापासून जवळपास ५० किमी अंतरावर जलेसरजवळ हनुमानाचे एक मंदिर असून या मंदिरातील हनुमानाच्या मूर्तीला चक्क घाम सुटत असल्याचे वृत्त आहे.

यासंदर्भातील माहिती मंदिरातील पुजाऱ्यांनीच दिली असून मंदिरातील हनुमानाच्या मूर्तीला आपत्कालीन परिस्थितीमध्ये घाम येतो. त्याचबरोबर हनुमानाच्या शरीरावरील नसासुध्दा दिसून येतात. म्हणूनच याला भाविक ‘घाम येणारे हनुमान’ म्हणून ओळखतात. ५०० वर्ष जुने हे मंदिर असून याठिकाणी आधी बांके बिहारी यांचे मंदिर होते. त्यांनतर येथे हनुमानाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.

या मूर्तीची स्थापना राजा पृथ्वी सिंह यांनी केली होती. भक्तांची या मंदिरातील हनुमानजींवर प्रचंड श्रध्दा आहे. बजरंगबलीच्या दर्शनासाठी भाविक दर महिन्याच्या प्रत्येक मंगळवार आणि शनिवारी गर्दी करत असतात. या ठिकाणाचे नाव आधी खलीलगंज असे होते. पण हनुमानजींच्या मंदिरानंतर या ठिकाणाचे नाव बदलून महावीरगंज असे करण्यात आले.

हनुमानाच्या मूर्तीवर सर्वसाधारणपणे शेंदूर चढवला जातो. पण याठिकाणच्या मूर्तीवर शेंदूर चढवण्यास मनाई आहे. शेंदूर चढवल्यास मूर्तीच्या नसा उघड्या पडतात, असा भाविकांचा समज आहे. या मूर्तीला सर्वप्रथम १९३५ साली घाम आला होता, असे सांगण्यात येते.