चीनमध्ये बालवाडीतील मुलांसाठी रोबोट शिक्षक

robot
चीनमध्ये बालवाडीतील मुलांना शिकविण्यासाठी रोबो शिक्षक नियुक्त करण्यात आले असून छोट्या बालकांमध्ये हे रोबोट अत्यंत लोकप्रिय असल्याचे सांगण्यात येत आहे.

चीनमधील अनेक किंडरगार्टनमध्ये अशा प्रकारचे रोबो नियुक्त करण्यात आले आहेत. हे रोबोट 60 सेंटिमीटर म्हणजेच दोन फूट उंच असून त्यांना कीको असे नाव देण्यात आले आहे. हा यांत्रिक शिक्षक विद्यार्थ्यांना गोष्टी सांगतो आणि कोडी सोडविण्यासाठी त्यांना मदत करतो.हा यंत्रमानव चाकावर चालतो आणि त्याच्या डोळ्यांमध्ये कॅमेरे लावण्यात आले आहेत.

कीको रोबोट झियामेन टेक्नॉलॉजी ही कंपनी अशा प्रकारचे शिक्षक रोबोट तयार करते. या कंपनीत प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या कॅंडी झिआंग या शिक्षिकेने एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले, की शिक्षण हे आता एकमार्गी राहिले नाही. गोल डोके आणि लांबुळके शरीर असलेल्या कीकोला मुले पाहतात तेव्हा मुलांना तो खूप आवडतो. देशातील सहाशेपेक्षा अधिक किंडरगार्टनमध्ये किको नियुक्त करण्यात आले आहेत.

चीनमध्ये किराणा सामानाची खरेदी करणारे तसेच वृद्ध व्यक्तींना सोबत करणारे यंत्रमानव विकसित करण्यात आली आहेत. मात्र शाळेतील वर्गात माणसांच्या ऐवजी केवळ यंत्रमानव नियुक्त करण्यासाठी अद्याप काही काळ जावा लागेल, असे झी यिन या एका किंडरगार्टनच्या प्राचार्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

Leave a Comment