रिटेल बाजारपेठेचा चेहरामोहरा बदलून टाकणार अलिबाबाचे ‘हमा’ स्टोअर्स

alibaba
इ-कॉमर्स कंपनी ‘अलिबाबा’ने चीनमध्ये सुरु केलेल्या ‘हमा’ स्टोअर्समुळे रिटेल बाजारपेठेचा चेहरामोहरा बदलण्याची चिन्हे आहेत. चीनमध्ये एकूण २५ हमा सुपरमार्केट्स असून, आणखी तितकीच सुपरमार्केट्स लवकरच निरनिरळ्या शहरांमध्ये आणण्याची ‘अलिबाबा’ची योजना आहे. या दुकानामध्ये जाऊन ऑनलाईन आणि ऑफलाईन खरेद करणे ग्राहकांना शक्य आहे. तसेच या सुपरमार्केट्समध्ये रेस्टॉरंट्सची सेवाही ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली असून, येथे आपल्या पसंतीने ताजे सी-फूड निवडून, त्यापासून बनलेला खाद्यपदार्थ तिथल्या तिथे ग्राहकाला उपलब्ध करून देण्यात येतो. हा पदार्थ सर्व्ह करण्यासाठी रोबोट्सची व्यवस्था आहे. हे रोबोटिक ट्रे ग्राहकाकडे कन्व्हेअर बेल्ट्स वरुन पोहोचविले जातात. सूप्स, किंवा इतर द्रव पदार्थ सर्व्ह करण्यासाठी मात्र रेस्टॉरंटमध्ये वेटर्स उपलब्ध आहेत.
alibaba1
ग्राहकांना या स्टोअर्समधून ऑनलाईन खरेदी देखील करता येऊ शकते. ग्राहकाचे घर जर स्टोअर पासून तीन किलोमीटरच्या परिसरात असेल, तर त्याने खरेदी केलेले सामान त्याने ऑर्डर दिल्याच्या अर्ध्या तासाच्या आतमध्ये त्याच्या घरापर्यंत पोहोचविण्याची सोय स्टोअरच्या वतीने केली जाते. ही खरेदी करताना ग्राहकांनी ‘अली-पे’ या अॅपद्वारे पेमेंट करावयाचे असते.

आजवर चीनमध्ये रिटेल सुपरमार्केट्समध्येही, अन्य सुपरमार्केट्स प्रमाणेच सोयी उपलब्ध होत्या. खरेदीसाठी लांबच लांब रांगा, आणि ग्राहकांच्या पसंती आणि सोयींचा सुपरमार्केट्स कधीही न करीत असलेला विचार, यामुळे या ठिकाणी केवळ पर्याय नसल्यामुळे ग्राहक खरेदीसाठी जात असत. पण आता नव्याने आलेली अलीबाबाची ‘हमा’ स्टोअर्स ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवीत असल्यामुळे ग्राहकांच्या पसंती-नापसंती, आणि सोय लक्षात घेऊन सर्व सुविधा येथे पुरविण्यात येत आहेत. त्यामुळे साहजिकच ग्राहक या स्टोअर्सकडे आकृष्ट होताना दिसत आहेत. तसेच या स्टोअर्समध्ये उपलब्ध असलेले खाद्यपदार्थ, फळे, भाज्या ‘हमा’ या ब्रँड च्या नावाने विकल्या जात आहेत. ज्याप्रमाणे अमेरिकेमध्ये अॅमेझॉनने ‘होल फुड्स’ या ब्रँड नेम चा वापर करीत खाद्यपदार्थ, धान्य, फळे, भाज्या इत्यादी वस्तूंची विक्री सुरु केली आहे, त्याचप्रमाणे अलिबाबाने ‘हमा’ हे ब्रँड नेम सर्व ‘ग्रोसरीज’ करिता निवडलेले आहे.
alibaba2
इतकेच नाही, तर वस्तूची चव चाखून पाहून ती ठीक वाटल्यास मगच खरेदी करण्याची मुभाही ‘हमा’ ने ग्राहकांना दिलेली आहे. तसेच एखाद्या ‘एक्झॉटिक’ खाद्यपदार्थाबद्दल ग्राहकाला माहिती हवी असल्यास, ती देखील ग्राहकाला त्वरित ऑनलाईन सेवेमार्फत पुरविली जात असते. म्हणजेच तो ठराविक पदार्थ कुठला आहे आणि कुठल्या कामी त्याचा वापर केला जाऊ शकतो ही माहिती ग्राहकाला त्वरीत पुरविली जाते. त्यामुळे या स्टोअर्समध्ये खरेदी करणे ग्राहकांसाठी एक रोचक अनुभव ठरू लागला आहे.

Leave a Comment