सॅन फ्रान्सिस्को – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुगलसह इतर सोशल मीडिया फेक न्यूज पसरवत असून या माध्यमांचा वापर अत्यंत घातक होत चालला असल्याचा आरोप करत, त्यांनी सोशल मीडियाला काळजीपूर्वक वागण्याची तंबी वजा सल्ला दिला आहे.
सर्वच सोशल मीडियाला ट्रम्प यांचा तंबी वजा सल्ला
ट्रम्प पुढे बोलताना म्हणाले, की बहुसंख्य लोकांचा गुगल फायदा उचलत असून ते कॉन्झर्वेटीव्ह विचारांना नष्ट करण्यासाठी आराखडा आखत आहेत. ट्रम्प न्यूज असे गुगलवर सर्च केल्यास फक्त फेक न्यूजच दिसतात. माझ्याविषयी त्यांना चुकीची माहिती पसरवायची असल्यामुळे, या सर्व बातम्या अतिशय वाईट असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला.
यावेळी, एकूणच माध्यमांवर ट्रम्प यांनी टीका केली. ते म्हणाले, रिपब्लिकन पक्षाचा मीडिया जो होता तो बंद पडला आहे. ९६ टक्के माझ्याविषयीच्या बातम्या या डाव्या विचारांच्या माध्यमांनी दिलेल्या असतात. कॉन्झर्वेटीव्ह विचारांना दडपण्याचे काम गुगल आणि ही माध्यमे करत आहेत. तसेच, लोकांपासून चांगली माहिती दडवून ठेवत आहेत. आपण काय पाहावे आणि काय नाही यावर तेच नियंत्रण ठेवत आहेत. आपण फारच गंभीर स्थितीला तोंड देत आहोत.
दरम्यान, आपल्या या विधानाची पुष्टी होईल, असा एकही पुरावा ट्रम्प यांनी दिला नाही. पण, पी.जे.मीडिया या कॉन्झर्वेटीव्ह ब्लॉगचा दाखला दिला. ट्रम्प यांच्याशी संबंधीत बातम्या डाव्या विचारसरणीच्या मीडियाची निर्मिती आहे, असा निष्कर्ष या ब्लॉगने काढला होता.
दरम्यान ट्रम्प यांचे आरोप गुगलने फेटाळून लावले असून स्पष्टीकरण देताना गुगलने म्हटले, की कोणत्याही राजकीय विचारसरणीची बाजू गुगल घेत नाही. सर्चबारमध्ये जी माहिती आमचे ग्राहक विचारतात, तिचे योग्य उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आमच्या सर्च रिझल्टमध्ये आम्ही नेहमी सुधारणा घडवण्याचा प्रयत्न करतो. कोणतीही राजकीय भावना गुगल निर्माण करत नाही.